Chandrakant Khaire Black Magic Claim: स्वतःला अंकशास्त्राचा बाप म्हणवून घेणाऱ्या आणि दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या अशोक खरात उर्फ बाबाच्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधींच्या खंडणीचे आरोप असलेल्या या भोंदू बाबावर आता राजकीय वर्तुळातूनही अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या प्रकरणात उडी घेत खरातवर अत्यंत टोकदार शब्दांत हल्ला चढवला आहे. खरात हा हिंदू धर्मावरील कलंक असून त्याला थेट गोळी मारली पाहिजे किंवा फाशी दिली पाहिजे, अशी खळबळजनक मागणी खैरेंनी केली आहे. याचवेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक प्रसंग सांगत खळबळ उडवून दिली आहे.
खरात हिंदू धर्माला कलंक
अशोक खरात याच्यावर सात महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले असून जादूटोण्याच्या नावाखाली त्याने अनेक कुटुंबं उद्ध्वस्त केल्याचे समोर आले आहे. यावर बोलताना चंद्रकांत खैरे कमालीचे आक्रमक झाले. खरातसारख्या प्रवृत्तीमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते, असे ते म्हणाले.
खरातला फाशी दिल्यास भविष्यात दुसरे भोंदू बाबा तयार होणार नाहीत. खरातकडे अनेक बडे लोक जात होते, त्याचे पूजापाठ करतानाचे फोटो मी स्वतः पाहिले आहेत. जे लोक त्याच्या पाया पडत होते, त्या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी खैरेंनी केली आहे.
( नक्की वाचा : Ashok Kharat : 30 वर्षांच्या महिलेचं शोषण आणि 5 नरबळी? अशोक खरातच्या 'त्या' गोळ्यांनी कोर्टात खळबळ )
'माझ्यावर जादूटोणा करणारा मेला'
या प्रकरणावर बोलताना चंद्रकांत खैरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, राजकारणात आणि वैयक्तिक आयुष्यात अनेकांनी माझ्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मी कट्टर देवभक्त असल्याने मला काहीही झाले नाही. उलट, माझ्यावर जादूटोणा करणारा माणूस स्वतःच मेला, असा दावा खैरेंनी केला आहे.
( नक्की वाचा : Ashok Kharat : एपस्टीनचा बाप' निघाला अशोक खरात; 56 आक्षेपार्ह क्लिप्स? 7 बड्या नेत्यांचे फोटो, अजून किती बाकी? )
जादूटोणा करणाऱ्याचा अंत हा वाईटच होतो, असे सांगताना खैरे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला. मुख्यमंत्री फडणवीस यांना पदावरून हटवण्यासाठी देखील काहींनी जादूटोण्याचा आधार घेतला असावा, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.