राकेश गुडेकर, प्रतिनिधी
Khed Jagbudi river: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधून दोन दिवसांपूर्वी काळजाला चटका देणारी एक घटना घडली होती. जगबुडी नदीच्या खोल डोहात बुडून तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या भयंकर दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या तिन्ही भावांचा मृत्यूपूर्वीचा एक अत्यंत भावुक करणारा व्हिडिओ समोर आला आहे.
नदीत उतरण्यापूर्वी काही मिनिटे आधीच हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. काही क्षणात ज्यांच्यावर काळाने घाला घातला, ते तिघेही भाऊ या व्हिडिओमध्ये अत्यंत आनंदी आणि हसत्या-खेळत्या मूडमध्ये दिसत असल्याने हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
काही क्षणातच घातला काळाने घाला
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या कथित शेवटच्या व्हिडिओमध्ये आकाश रामा कांबळे, नरेश रामा कांबळे आणि कैलास रामा कांबळे हे तिघेही सख्खे भाऊ जगबुडी नदीच्या किनाऱ्यावर सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. भोस्ते गावाच्या सीमेवरील बदमीचा पर्या या निसर्गरम्य ठिकाणी पोहण्यासाठी उतरण्यापूर्वी त्यांनी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला होता.
काही वेळातच आपला मृत्यू होईल याची कोणतीही कल्पना नसलेले हे तिन्ही तरुण अत्यंत उत्साहात होते, मात्र या व्हिडिओनंतर अवघ्या काही मिनिटांतच तिथे मोठा अनर्थ घडला.
( नक्की वाचा : 'तिने आरडाओरड केली अन्..." डहाणूमध्ये तरुणीच्या धाडसामुळे टळला मोठा अनर्थ; लव्ह जिहादनंतर आणखी एक प्रकार )
नेमकी कशी घडली होती ही दुर्घटना?
सांगली जिल्ह्यातील मूळचे असलेले हे तिन्ही भाऊ मुंबईतील कुर्ला भागात एकत्र राहत होते. उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी आणि आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ते रत्नागिरीतील खेड येथे आले होते. बुधवारच्या दुपारी उकाड्यापासून आराम मिळवण्यासाठी हे तिघे जण आपल्या आणखी एका नातेवाईकासह जगबुडी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले.
मात्र, नदीतील पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने हे चौघेही अचानक खोल पाण्याचा डोहात ओढले गेले आणि बुडू लागले.
स्थानिकांचे प्रयत्न पण...
नदीकिनारी आरडाओरड झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकाने तात्काळ नदीच्या दिशेने धाव घेतली. पाण्याचा प्रवाहातून एका युवकाला वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, ज्यामुळे त्याचा जीव वाचला.
मात्र, दुर्दैवाने आकाश, नरेश आणि कैलास या तिघा सख्ख्या भावांना वाचवण्यात यश आले नाही. पाण्याचा प्रचंड प्रवाहामुळे तिघांचाही बुडून जागीच मृत्यू झाला.
एकाच घरातील तीन तरुण आणि कमवत्या भावांचा असा अचानक अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुट्टीचा आनंद साजरा करताना अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने खेड तालुक्यासह सांगली आणि मुंबईत हळहळ व्यक्त होत आहे. आता समोर आलेल्या त्यांच्या शेवटच्या व्हिडिओमुळे जगबुडी नदीतील या हृदयद्रावक दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून नागरिक तीव्र दुःख व्यक्त करत आहेत.