योगेश शिरसाट, अकोला
तलाठी कार्यालयात घुसून मंडळ अधिकाऱ्यावर चाकून जीवघेणा हल्ल्या केल्याची घटना अकोल्याच्या अकोट तालक्यातील गजानन नगर येथे घडली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. गणेश गोविंद भारती असं जखमी मंडळ अधिकाऱ्याचं नाव आहे. तर सुनील अंबादास कतोरे आणि माधव नामदेव ताडे अशी हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कतोरे आणि ताडे या दोघांनी केलेल्या हल्ल्यात भारती यांना गंभीर दुखापत झाली असून, घटनास्थळी क्षणात एकच गोंधळ उडाला. सरकारी कार्यालयात खुलेआम चाकू चालवला गेला, हे अत्यंत गंभीर असून यामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हल्ल्याचं कारण काय?
वडिलांनी रजिस्टर बक्षीस पत्र करून शेती एका भावाला व त्याच्या मुलाला दिली होती. त्याचा राग मनात धरून दोघांनी मंडळ अधिकारी गणेश भारती यांच्यावर हा हल्ला चढवला. त्यांच्या गळ्यावर कटरने मारून त्यांना गंभीर जखमी केले.
घटनेची माहिती मिळताच अकोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी सुनील कतोरे व महादेव ताडे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता नुसार कलम 109, 132, 351(2), 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, या भ्याड हल्ल्याचा विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा अकोट यांच्यावतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
दरम्यान, आज रोजी संपूर्ण अकोट उपविभागात एकदिवसीय कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. हा हल्ला केवळ एका अधिकाऱ्यावर नाही, तर संपूर्ण प्रशासनावरच आहे. सरकारने आता गप्प न बसता अधिकारी सुरक्षेची ठोस हमी द्यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया महसूल कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे. अशा हल्ल्यांनी शासकीय कार्यालयांचा कार्यसंघ दहशतीत काम करावा लागतो हे वास्तव अधोरेखित झाले आहे.