Kolhapur News: पर्यटकांच्या आणि परजिल्ह्यातील वाहनांच्या संख्येत होणारी प्रचंड वाढ लक्षात घेऊन, कोल्हापूर महापालिकेने एक वादग्रस्त पाऊल उचलले आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या बाहेरील वाहनांवर 'प्रवेश कर' आकारण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर आणण्यात आला आहे. महापालिकेच्या या संभाव्य निर्णयामुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असून, या मनमानी प्रस्तावाविरोधात कोल्हापुरातून अत्यंत तीव्र संतापाचा सूर उमटत आहे.
काय आहे महापालिकेचा नवा प्रस्ताव?
कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेवकांनी दाखल केलेल्या ठरावानुसार, शहरात वाहतुकीचा ताण वाढवणार्या बाहेरील वाहनांकडून कर वसूल केला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार, केवळ कोल्हापूर जिल्हा पासिंग असलेल्या म्हणजेच MH 09 च्या वाहनांना या प्रवेश करामधून पूर्णपणे वगळण्यात येईल. शेजारील कर्नाटक राज्यासह देशाच्या इतर कोणत्याही भागातून कोल्हापुरात येणाऱ्या सर्व व्यावसायिक आणि खासगी वाहनांवर हा कर लागू केला जाणार आहे.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
17 जून रोजी होणार फैसला
महापालिका प्रशासनाने यासंदर्भात सविस्तर प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी करण्यात आली असून 17 जून रोजी होणाऱ्या महासभेत यावर अंतिम निर्णय होणार आहे. महासभेने मंजुरी दिल्यास हा कायदा लागू होईल.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे सुसाट! अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार प्रवास; रेल्वे मंत्रालयाचा मास्टरप्लॅन)
महापालिकेचा हा प्रस्ताव एकतर्फी, व्यापारी विरोधी आणि सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारा आहे, अशी टीका करत कोल्हापुरातील विविध संघटना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. जनता दल (धर्मनिरपेक्ष), स्वाभिमानी शेतकरी संघटना, हिंदू एकता आंदोलन आणि 'कॉमन मॅन' संघटनेने या प्रस्तावाला जाहीर कडाडून विरोध केला आहे.