विशाल पुजारी, कोल्हापूर: नातेवाईकांनी आणलेला कप केक खाल्ल्याने बहीण भावाचा मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. नातेवाईकांनी आणलेल्या कप केकमधून विषबाधा झाल्याने दोन्ही बहीण- भावंडांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नातेवाईकांनी आणलेला कप केक खाल्याने बहीण भावाला विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरच्या कागलमध्ये घडली. श्रीयांश आंगज (वय,5) आणि काव्या आंगज (वय,8) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. कागलच्या चिमगाव येथे रणजित आंगज पत्नी व आपल्या दोन मुलांसोबत राहतात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी आलेल्या नातेवाईकांनी लहान मुलांना खाण्यासाठी कप केक आणला होता.
नक्की वाचा: फडणवीस करणार आपल्या नावावर अनोखं रेकॉर्ड, जे भुजबळ,आबा, दादांना जमलं नाही ते...
हा कप केक दोन्ही मुलांनी खाल्ला ज्यानंतर दोन्ही मुलांना त्रास जाणवू लागला. श्रीयांश आंगज आणि काव्या आंगज यांना उलटी, मळमळ असा त्रास जाणवू लागला. त्यानंतर दोन्ही मुलगा श्रीयांश याला मुरगूडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मुलगी काव्यालाही तोच त्रास जाणवू लागला. ज्यानंतर तिलाही सायंकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु तिचीही प्रकृती खालावत होती. तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयातही दाखल करण्यात आले. त्या रुग्णालयातही तिची प्रकृती काही सुधारली नाही. यामध्येच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. धक्कादायक म्हणजे चिमुकल्यांच्या आईलाही उलटी, मळमळ असा त्रास जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, काव्या आणि श्रीयांजच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.