Circuit Bench News : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरात सर्किट बेंच (Kolhapur Circuit Bench) मागणीला अखेर 40 वर्षानंतर यश आलं आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांचं मिळून कोल्हापुरात सुरू होणाऱ्या सर्किट बेंचला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी अधिसूचना जारी केली. या अधिसुचनेनुसार उद्या 18 ऑगस्टपासून कोल्हापुरात न्यायालयाच्या जुन्या इमारतीत सर्किट बेंचचे कामकाज सुरू होणार आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज उद्घाटन...
आज दुपारी ३.३० वाजता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन केलं जाणार आहे. यावेळी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या सभारंभासाठी कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांतून सुमारे पाच हजार जणं येणार असल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - उच्च न्यायालयाचं 'सर्किट बेंच' म्हणजे काय? कोल्हापूरकरांना कसा होईल फायदा?
कोल्हापुरकरांसाठी अत्यंत मोलाचा दिवस...
गेल्या कित्येक वर्षांपासून कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू करण्याची तयारी होती. उद्यापासून हे स्वप्न पूर्ण होणार आहे. यामुळे कोल्हापुरात उत्साहाचं वातावरण आहे. शासकीय इमारतींवर रोषनाई करण्यात आली असून अवघ्या कोल्हापुरकरांमध्ये उत्सुकता आहे.
पहिल्याच टप्प्यात कामकाजाचा मोठा ताण...
कोल्हापुरच्या सर्किट बेंचकडे मुंबई उच्च न्यायालयाकडून तब्बल १ लाख २० हजार प्रकरणं वर्ग करण्यात आली आहेत. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांचा यात समावेश आहे. यामध्ये निवडक १५ याचिकांचाही समावेश आहे.पहिल्या टप्प्यात वर्ग झालेल्या याचिकांमध्ये राजकीय व्यक्तींवरील प्रकरणांचा समावेश आहे. यामध्ये बंटी पाटील यांच्याविरोघात राजवर्धन विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांची याचिका, २०२५ मध्ये शशिकांत खोत विरुद्ध अंमल महादेवराय महाडिक, पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले, प्रशांत यादव विरुद्ध शेखर निकम, राहुल पाटील विरुद्ध शसिकांत शिंदे, नरसय्या आडम विरुद्ध देवेंद्र कोठे, महेश कोठे वि. अशोकराव माने यांचा समावेश आहे.
सर्किट बेंच म्हणजे काय?
हायकोर्टाची सर्किट बेंच (Circuit Bench) म्हणजे उच्च न्यायालयाचा एक तात्पुरता किंवा अस्थायी विभाग. हे खंडपीठ मुख्य न्यायालयाच्या क्षेत्राबाहेरील दूरच्या भागांमध्ये किंवा ठिकाणी खटले ऐकण्यासाठी स्थापन केले जाते. सर्किट बेंच विशिष्ट कालावधीसाठी, सहसा वर्षातून काही दिवस किंवा महिने काम करते. त्यामुळे हे नियमितपणे चालणाऱ्या कायमस्वरूपी खंडपीठासारखे नसते.
सर्किट बेंच का स्थापन करतात?
सर्किट बेंच सुरु करण्याचं मुख्य उद्दिष्ट दूरच्या किंवा दुर्गम भागातील लोकांना न्याय मिळवून देणे आणि मुख्य न्यायालयात जमा झालेल्या प्रकरणांचा निपटारा करणे हे असते. सर्किट बेंचमुळे याचिकाकर्ते आणि वकिलांना मोठ्या शहरांमधील मुख्य न्यायालयात जाण्याचा प्रवास खर्च आणि त्रास वाचतो.