जाहिरात

Sant Balumama Trust Scam: संत बाळूमामा ट्रस्टमध्ये महाघोटाळा; 30-40 हजार मेंढ्या 'गिळल्या', जमीनही गायब

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील श्री सद्गुरू संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल 60 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे.

Sant Balumama Trust Scam: संत बाळूमामा ट्रस्टमध्ये महाघोटाळा; 30-40 हजार मेंढ्या 'गिळल्या', जमीनही गायब

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे परम श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री सद्गुरू संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये तब्बल 60 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. देवस्थानच्या मालकीच्या हजारो मेंढ्यांची बेकायदेशीर विक्री आणि जमिनींच्या व्यवहारात झालेला अपहार यामुळे धार्मिक व सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. भुदरगड पोलीस ठाण्यात दाखल असलेला हा गंभीर गुन्हा आता पुढील सखोल तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आला आहे.

15 हजारांची मेंढी अवघ्या साडेपाच हजारात विकली!

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घोटाळ्यात तब्बल 30 ते 40 हजार मेंढ्यांची बेकायदेशीरपणे विक्री करण्यात आल्याचा संशय आहे. बाजारात एका मेंढीची किमान किंमत 15 हजार रुपये असताना ती केवळ साडेपाच हजार रुपयांना विकल्याचे तपासात समोर आले आहे. एकट्या मेंढ्यांच्या विक्रीतून सुमारे 30 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा अंदाज आहे.

मेंढ्यांच्या विक्रीव्यतिरिक्त देवस्थानच्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारात आणि कागदपत्रांच्या गैरवापरात 30 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. अशा प्रकारे एकूण 60 कोटी रुपयांचा हा भव्य घोटाळा असल्याचे पोलिसांचे प्राथमिक मत आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांची सखोल चौकशीची मागणी

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की, "बाळूमामा देवस्थान ट्रस्ट हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या 60 कोटींच्या घोटाळ्याची अत्यंत सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. यामध्ये आणखी काही मोठे चेहरे सहभागी असल्याचा संशय असून, दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे."

तत्कालीन निरीक्षण अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात तत्कालीन निरीक्षण अधिकारी रागिनी खडके, रावसाहेब कोणकरी, इतर संबंधित विश्वस्त आणि कंत्राटदारांविरोधात विश्वासघात व फसवणुकीचा गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. देवस्थानच्या निधीचा नियमबाह्य वापर करणे, धनादेशांमध्ये गैरव्यवहार करणे आणि कंत्राटदारांशी साठेलोठे करून आर्थिक लाभ मिळवणे अशा स्वरूपाचे गंभीर आरोप यांच्यावर आहेत. याच आरोपांमुळे काही दिवसांपूर्वी रागिनी खडके यांचे निलंबनही करण्यात आले होते.

लाखो भाविकांच्या भावनेशी आणि दानाशी खेळणाऱ्या या घोटाळेबाजांवर पोलीस आता कोणती कडक कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com