विशाल पुजारी
नवरात्र उत्सव काळात दरवर्षी करवीर निवासिनी अंबाबाई देवीला तिरुपती देवस्थान करून मानाचा शालू येत असतो. यंदाही वाजत गाजत रिती-रिवाजाप्रमाणे देवीला शालू अर्पण करण्यात आला. हा शालू अर्पण करण्यासाठी देवस्थान समितीचे सदस्य स्वतः उपस्थित असतात. त्यामुळे आज शालू अर्पण करते वेळी मंदिरात मोठी गर्दी होती. करवीर निवासिनी अंबाबाई देवीला दरवर्षी शालू अर्पण करण्याची परंपरा आहे. तिरुपती देवस्थान कडून येणारा शालू हा मानाचा शालू समजला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा आजही कायम आहे.
आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास तिरुपती देवस्थान समितीचे सदस्य आणि इतर काही मंडळी अंबाबाई मंदिरात हा शालू अर्पण करण्यासाठी दाखल झाले. पारंपारिक वाद्यांच्या गजरात हा शालू गाभाऱ्यापर्यंत नेण्यात आला. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे शालू सुपूर्द करण्यात आला. गाभाऱ्यात हा शालू नेल्यानंतर त्याचं विधिवत पूजन करण्यात आलं. मानाचा शालू अर्पण होताना आनंददायी आणि भक्तिमय प्रतिक्रिया व्यक्त केल्या. देशातल्या मोठ्या देवस्थानकडून येणारा हा शालू दरवर्षी चर्चेत असतो.
यंदाचा तिरूमला देवस्थान करून आलेला हा शालू तब्बल 1 लाख 66 हजार रुपये इतक्या किंमतीचा होता. अशी माहिती अंबाबाई देवस्थान कडून देण्यात आली आहे. गुलाबी काठ आणि पिस्ता रंगाचा हा शालू आहे. तिरूमला देवस्थानचे व्ही प्रभाकर रेड्डी, आमदार व्ही प्रशांती रेड्डी, भानूप्रकाश रेड्डी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे हा शालू सुपूर्द करण्यात आला. हा शालू अर्पण केल्यानंतर त्याचं विधीवत पूजन करण्यात आलं. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.तिरुपती देवस्थानचा शालू अर्पण केल्यानंतर विजयादशमी दिवशी देवीला हा शालू नेसवला जातो. त्यानंतर लिलावाद्वारे या शालूची विक्री केली जाते.
शालू देण्याची प्रथा, परंपरा काय ?
मूर्तिशास्त्र अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी या शालू अर्पण करण्याच्या परंपरे बाबत माहिती दिली आहे. तिरुपती देवस्थान कडून देशातील सर्व शक्तीपीठांना मानाचा शालू अर्पण केला जातो. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ पैकी एक समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाईला देखील हा शालू अर्पण केला. साधारणतः 1970 ते 80 च्या दशकात ही प्रथा सुरू झाली. धार्मिक पद्धतीने विधी व पूजन या शालूचं केलं जातं. राज्यभरातल्या भाविकांमध्ये लिलावात हा शालू घेण्याची भक्तिमय भावना असते. त्यामुळे दरवर्षी या शालूला किती किंमत येणार अशा चर्चा रंगत असतात. शालूच्या लिलावातून मिळालेली रक्कम देवस्थानाच्या विकासासाठी वापरली जाते