Konkan Railway : कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी जाहीर केलेल्या 'रो-रो' कार सेवेला अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. ही सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत फक्त एकच बुकिंग झाली आहे, परंतु हा पहिला प्रवासी आपल्या कुटुंबासह या प्रवासासाठी खूप उत्सुक आहे. नवी मुंबईतील (Navi Mumbai) रहिवासी असलेले रोहन प्रकाश कंदर हे पहिले प्रवासी आहेत, ज्यांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी बुकिंग केली आहे.
30 वर्षीय रोहन कंदर हे एचडीएफसी बँकेत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 'मिड-डे' वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, "प्रवास करणे ही माझी नेहमीच आवड राहिली आहे. याआधी मी बाईकवरून प्रवास करायचो, पण आता कुटुंब आणि चारचाकी गाडी असल्याने मला काहीतरी वेगळे करायचे होते. म्हणून मी या सेवेचे बुकिंग केले." त्यांच्यासोबत 4 महिन्यांचे बाळ असल्याने लांबचा प्रवास टाळून आरामशीर प्रवासासाठी ही सेवा उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.
(नक्की वाचा- Trump Tariffs : भारताला अमेरिकेचा धक्का, 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ; या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसणार)
कोकणातील आपल्या मूळ गावी कणकवलीला जाण्यासाठी रोहन कंदर यांनी ही सेवा निवडली आहे. त्यांनी सांगितले की, "माझ्याकडे 5-डोर फोर्स गुरखा ही गाडी आहे. मी कोलाडपर्यंत गाडी चालवून जाईन, जिथे गाडी रेल्वेत लोड केली जाईल आणि तिथूनच माझा प्रवास सुरू होईल. मला खूप आनंद होत आहे. महामार्गावरील अपूर्ण काम आणि खड्डे टाळण्यासाठी ही सेवा अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर असल्याचेही त्यांनी सांगितले.
रोहन यांनी या सेवेला सध्या मिळत असलेल्या कमी प्रतिसादावरही मत व्यक्त केले. "चांगल्या गोष्टींना रुजायला वेळ लागतो. भारतात पहिल्यांदाच अशी सेवा सुरू झाली आहे, जिथे लोक त्यांच्या गाडीसोबत ट्रेनने प्रवास करू शकतात. ही कल्पना अजून लोकांनी स्वीकारली नाही. कोकणातील इतर ठिकाणीही थांबे वाढले की बुकिंग नक्कीच वाढेल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कशी असेल रो-रो सेवा
कोलाड (महाराष्ट्र) ते वेर्णा (गोवा) असा या प्रवासाचा मार्ग असणार आहे. 23 ऑगस्ट रोजी कोलाड येथून सायंकाळी 5 वाजता या प्रवासाला सुरुवात होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता वेर्णा येथे पोहोचणार आहे.
(नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप)
खर्च किती?
रो- रो सेवेसाठी एका गाडीमागे 7875 रुपये एका बाजूचे शुल्क आहे. प्रवाशांसाठी 3AC मध्ये प्रति व्यक्ती 935 रुपये, 2S मध्ये प्रति व्यक्ती 190 रुपये तिकीट आहे. एका ट्रेनमध्ये जास्तीत जास्त 40 गाड्यांची क्षमता असणार आहे. जर 16 पेक्षा कमी गाड्यांचे बुकिंग झाले तर ही सेवा रद्द केली जाईल. त्यामुळे रोहन कंदर यांना या सेवेचा आनंद घेता येईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.