Malvani Khaja: पाणीपुरी, कापड बाजारानंतर आता मालवणी खाजावरही परप्रांतीयांचा डल्ला; थेट कारखानाच थाटला!

Malvani Khaja: जत्रांची शान आणि कोकणच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला हा पारंपरिक खाजा आता एका वेगळ्याच संकटात सापडला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Malvani Khaja: या प्रकारामुळे स्थानिक व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सिंधुदुर्ग:

गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी

Malvani Khaja: कोकणात येणारा प्रत्येक पर्यटक आणि तिथून मुंबईत परतणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्यासोबत  एक गोष्ट आवर्जून घेऊन जातो, ती म्हणजे खमंग आणि चविष्ट मालवणी खाजा. जत्रांची शान आणि कोकणच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला हा पारंपरिक खाजा आता एका वेगळ्याच संकटात सापडला आहे. आजवर अनेक कोकणी कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन असलेला हा व्यवसाय आता हळूहळू परप्रांतीयांच्या ताब्यात जाऊ लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडलेल्या एका नव्या प्रकारामुळे संपूर्ण कोकणात आता एकाच चर्चेला उधाण आले आहे आणि यामुळे स्थानिक व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

काय आहे प्रकरण?

ज्या मालवणी खाजाची चव चाखत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या, त्या खाजाच्या निर्मितीवर आता परप्रांतीयांनी थेट डल्ला मारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात असलेल्या फोंडाघाट येथे चक्क एका परप्रांतीय कंपनीने खाजा निर्मितीचा भलामोठा कारखाना सुरू केला आहे. 

Advertisement

बुद्धीराम विश्वकर्मा फूड्स एलएलपी असे या कंपनीचे नाव असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर खाजाची निर्मिती केली जात आहे. विशेष म्हणजे, स्थानिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या खाजाच्या पाकिटावर गांगो माऊली सुप्रसिद्ध मालवणी खाजा असे स्थानिक नाव छापण्यात आले आहे. 

मात्र, याच पाकिटाच्या खालच्या बाजूला परप्रांतीय कंपनीचे नाव स्पष्टपणे लिहिलेले पाहायला मिळत आहे. बेसन आणि गुळाचा पाक करून बनवला जाणारा हा पारंपरिक पदार्थ आता स्थानिक कोकणी माणसाच्या हातातून निसटून परप्रांतीय कंपन्यांच्या नफ्याचे साधन बनू लागला आहे.

( नक्की वाचा : पालघरच्या हिंदू मुलींना फूस लावून थेट लंडनला पाठवण्याचे मोठे रॅकेट? 2 सख्ख्या बहिणींच्या छळानंतर खळबळजनक आरोप )

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि कोकणी माणसाचा संताप

कोकणातील खाद्यपदार्थांना मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी इथले लोकप्रतिनिधी अनेकदा प्रयत्न करताना दिसतात. कधी मुंबईच्या महापौरांना भेटून तर कधी विविध व्यासपीठांवरून कोकणी ब्रँडचा प्रचार केला जातो. मात्र, दुसरीकडे स्वतःच्याच जिल्ह्यात पारंपरिक व्यवसायावर परप्रांतीय व्यावसायिक उघडपणे अतिक्रमण करत असताना या लोकप्रतिनिधींचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. 

आमच्या हक्काच्या पारंपरिक व्यवसायात या परप्रांतीय कंपनीला जिल्ह्यात येऊन एवढा मोठा उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली कोणी, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य कोकणी माणूस विचारू लागला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये उड्डाणपुलाचा वाद आणखी चिघळला! आंबेडकरांना का सोडावी लागली बैठक? वाचा Inside Story )

निधीअभावी स्थानिक मागे आणि पैसेवाल्यांची चांदी

या गंभीर आणि संवेदनशील विषयावर माजी आमदार प्रमोद जठार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अत्यंत वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. कोकणी माणसाकडे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी मोठ्या कंपन्या उघडायला पुरेसा पैसा नसल्यामुळे, बाहेरचे पैसेवाले लोक इथे येऊन मोठ्या कंपन्या सुरू करतात आणि पदार्थ बनवतात, असे मोघम उत्तर त्यांनी दिले आहे.

केवळ मालवणी खाजा सारख्या पारंपरिक व्यवसायातच नव्हे, तर कोकणातील छोट्या-मोठ्या हॉटेल्समध्येही आता परप्रांतीय कामगारांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे स्थानिकांचा हक्काचा रोजगार तर बुडत आहेच, पण भविष्यात या परप्रांतीयांची मुजोरी वाढल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी भीती स्थानिक बेकरी चालक आणि व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

Advertisement

पारंपरिक उद्योगांना वाचवण्यासाठी संघटित होण्याची वेळ

पूर्वीच्या काळात फक्त मुंबई आणि इतर मोठ्या शहरांपुरता मर्यादित असलेला परप्रांतीयांचा लोंढा आता थेट सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. काही वर्षांपूर्वी केवळ पाणीपुरी विक्री किंवा कापड व्यवसायापुरते मर्यादित असलेले परप्रांतीय आता थेट मालवणी खाजा सारख्या कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेशी जोडलेल्या व्यवसायात शिरले आहेत. 

फोंडाघाट येथील हा प्रकार म्हणजे केवळ एक सुरुवात असू शकते. जर ही मक्तेदारी अशीच वाढत राहिली, तर भविष्यात कोकणचे सर्वच पारंपरिक उद्योग स्थानिकांच्या हातातून पूर्णपणे निसटून परप्रांतीयांच्या घशात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वेळ निघून जाण्यापूर्वीच या घुसखोरीला आळा घालण्यासाठी आणि आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आता सर्व कोकणवासीयांनी एकत्र येऊन संघटितपणे उभे राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
 

Topics mentioned in this article