Kalyan News: कल्याण पश्चिमेतील विठ्ठलवाडी परिसरात एका महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाच्या कामावरून निर्माण झालेला महापालिका आणि बुद्धभूमी फाऊंडेशन संस्थेमधील वाद आता आणखी चिघळला आहे. या वादावर शांततेने तोडगा काढण्यासाठी एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या बैठकीतच प्रचंड गदारोळ झाला. वाद इतका टोकाला गेला की, एका गटाचे समर्थक आणि शिवसेनेच्या नगरसेविका एकमेकांसमोर आल्याने बैठकीचे रूपांतर जोरदार राड्यात झाले. यामुळे बैठकीला उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्याला तडकाफडकी बैठक सोडून निघून जावे लागले असून या संपूर्ण गोंधळाचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
नेमकं काय घडलं?
कल्याणमधील प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी दरम्यान एका मोठ्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळे आणि बांधकामे हटवण्याची मोहीम महापालिकेकडून राबवली जात आहे. मात्र, वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवरून हा वाद निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या या कारवाईवर बुद्धभूमी फाउंडेशनच्या समर्थकांनी तीव्र आक्षेप घेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तसेच महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) यावर खुलासा करताना, आपली सर्व कारवाई पूर्णपणे नियमानुसारच सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये पुलाच्या कामासाठी खरंच बुद्धमूर्ती हटवल्या का? वाचा प्रशासनाने काय केला खुलासा )
कुणामध्ये झाला वाद?
हा वाढता वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी आणि सुवर्णमध्य काढण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला बुद्धभूमी फाउंडेशनचे भंतेजी गौतम रत्न, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, केडीएमसीमधील शिवसेनेच्या नगरसेविका माया कांबळे आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पाहता पाहता या बैठकीत प्रचंड गोंधळ आणि गदारोळ सुरू झाला.
आंबेडकरांनी सोडली बैठक
बैठकीतील वाढता गोंधळ आणि तणाव पाहून आनंदराज आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि ते ही बैठक अर्धवट सोडून निघून गेले. आनंदराज आंबेडकर बाहेर पडल्यानंतर बैठकीच्या ठिकाणी वातावरण आणखीनच तापले. उपस्थित फाउंडेशनच्या समर्थकांनी नगरसेविका माया कांबळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावर माया कांबळे यांनीही आक्रमक पवित्रा घेत फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर उलट गंभीर आरोप केले आहेत.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमधील 'तो' वाद आता थेट दिल्लीत! राहुल गांधी घेणार KDMC च्या कारवाईची दखल )
या हायव्होल्टेज ड्रामाचे आणि वादाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या गोंधळामुळे विठ्ठलवाडी आणि वालधुनी परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला असून उड्डाणपुलाचे काम आता पुन्हा रखडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस आणि प्रशासन या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून वाद अधिक वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world