महायुती सरकारने महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू केली. या योजनंअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षा बंधनापूर्वीच (Raksha Bandhan 2024) 'बहिणींना' ही भेट सरकारने देण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांचे मुख्य गाव असलेल्या 'दरे'गावाजवळच असलेल्या बामणोली येथून जेव्हा आम्ही आढावा घेतला तेव्हा आम्हाला काही 'बहिणी' अशा सापडल्या की ज्यांच्या खात्यात पैसे आले खरे मात्र ते काही सेकंदात गायब झाले.
हे ही वाचा: CM शिंदेंनी लाडक्या बहिणींसोबत साजरा केला रक्षाबंधन सण
आम्हाला काही बहिणी अशा सापडल्या ज्यांनी सांगितले की या योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्या 10-20 किलोमीटरचा प्रवास करून आल्या होत्या. यातील काही महिलांना त्रुटींमुळे या योजनेचा लाभ घेता आला नाही. काही महिलांची या योजनेसाठी यशस्वी नोंदणी झाली आणि त्यांच्या खात्यात पैसेही आले मात्र ते काही सेकंदातच गायब झाले. आम्ही यामागची कारणे शोधली तेव्हा कळाले की,बँकेत दोनतीन वेगवेगळी खाती असतात.मुदत ठेवीची खाती, बचत खाती आणि कर्जाची खाती अशी वेगवेगळी खाती असतात. यातील कर्ज खाते जर अनुत्पादक कर्जाचे असेल तर तीनही खात्यांच्या वापरावर बंदी येते. सरकारने सूचना केली होती की अनुदानाची किंवा मदतीची रक्कम खात्यात आली तर त्यावर बंधन येता कामा नये. मात्र बँकांच्या यंत्रणेमुळे यात अडचणी येत असते. त्यासाठी बँक व्यवस्थापकांकडे जाऊन त्यांच्याकडून यावर तोडगा काढावा लागतो. सध्या बँकेतील गर्दीमुळे यात अडचणी येत आहे.
बँकेच्या यंत्रणेला अनुदान मिळणारी खाती आणि बँकेतील इतर खाती असा फरक करता येत नाही त्यामुळे ही अडचण येत आहे. या अडचणीमुळे बहिणींच्या खात्यात जेव्हा रक्कम आली तेव्हा ती वेगवेगळे चार्जेस आणि बँकेकडून आकारली जाणारी काही विशिष्ट रक्कम वळती करण्यात आली ज्यामुळे काही सेकंदात या रकमेमुळे खात्यात आलेले पैसे गायब झाले. या प्रकारामुळे मुख्यमंत्र्यांच्या 'दरे' गावातील काही बहिणी नाराज झाल्या आहेत.
हे ही वाचा: Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींची निराशा! सरकारने 3000 रुपये दिले, हातात 500-1000 रुपये आले
बँकींग तज्ज्ञ देवीदास तुळजापूरकर यांनी या योजनेबद्दल बोलताना म्हटले की, "या योजनेत नियोजनाचा अभाव आहे. अनेकांची बचत खाती नाही, ती उघडण्यासाठी गर्दी होत आहे. बँक खाती आणि आधार नंबरची जोडणी झालेली नाहीये. त्यामुळेही अडचणी येत आहे. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले त्या बहिणी जेव्हा पैसे काढायला गेल्या तेव्हा विविध चार्जेसमुळे ते पैसे काढले गेले." अनेक बहिणींना खात्यात आलेले पैसे गेले कुठे असा प्रश्न पडू लागला आणि यामुळे बँकेमध्ये कर्मचारी आणि या बहिणींमधील शाब्दीक वाद वाढायला लागले आहेत.