लाडक्या बहिणींसाठी खूशखबर!फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू; या दिवशी खात्यात येणार रक्कम

Ladki Bahin Yojana News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बँक खात्यात पैसे कधी होणार जमा. वाचा सविस्तर बातमी.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्यातील हप्ता या दिवशी मिळणार"
NDTV Marathi

Ladki Bahin Yojana News: महाराष्ट्रातील लाखो महिलांचे लक्ष लागून असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'बाबत राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची अपडेट दिली आहे. फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून (27 मार्च) अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिलीय. पोस्टमधील माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्न (Aadhaar Linked) बँक खात्यांमध्ये हा निधी जमा होणार आहे.  

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्यातील हप्ता खात्यात कधी येणार?

मंत्री आदिती तटकरे यांनी पोस्ट करत म्हटलंय की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू!

Advertisement

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे."

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: 31 मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी!

दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया चुकली असेल त्यांच्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. याबाबतही आदिती तटकरे यांनी 6 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं होतं की, "e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे.

(नक्की वाचा: Ladki Bahin Yojana e-KYC News: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, e-KYC दुरुस्तीची संधी; ही आहे शेवटची तारीख)

या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती."