Latur News : बळीराजाचं राज्य कधी येणार? 75 वर्षांच्या शेतकऱ्याने 8 वर्षांपासून बैलाच्या जागी स्वत:ला जुंपलं 

8 वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नाला बैल विकले. मात्र त्यानंतर ते बैल कधीच घेऊ शकले नाहीत. तर दुसरीकडे दोन लाख रुपयाचा कर्जाचा बोजा देखील या शेतकऱ्यावर आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

विष्णू बुरगे, प्रतिनिधी

लातूरच्या (Latur News) अहमदपूर येथील अंबादास पवार या वृद्ध शेतकऱ्याची परिस्थिती संबंध देशाने पाहिली, मात्र याच वृद्ध शेतकऱ्यासारखा, लातूरच्या दुसऱ्या एका वृद्ध शेतकऱ्याची दयनीय अवस्था समोर आली आहे. औसा तालुक्यातील शिवनी बुद्रुक गावचे 75 वर्षाचे वैजनाथ सूर्यवंशी मागच्या 8 वर्षांपासून बैल नसल्याने स्वतःच शेतीतील (Latur farmer elderly couple) मशागतीचे काम करत आहेत. हे दोन्ही वृद्ध दाम्पत्य शेतात सध्या कोळपणीच काम करत आहे. 8 वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नाला बैल विकले. मात्र त्यानंतर ते बैल कधीच घेऊ शकले नाहीत. तर दुसरीकडे दोन लाख रुपयाचा कर्जाचा बोजा देखील या शेतकऱ्यावर आहे. घरची परिस्थिती हालाखीची आणि यात शेती करायची कशी, या प्रश्नाने घेरावलेल्या 75 वर्षाच्या वैजनाथ सूर्यवंशी यांनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपत कोळपणीचा जू हातात घेतलाय. डोक्यावरती कर्ज झालेला आहे, सरकारने कर्ज माफ करावे अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे. 

नक्की वाचा - रंधा धबधब्याच्या रुद्रावतारातून बचावला तरुण, अशी केली स्वत:ची सुटका; थरारक घटनेचा Video 

कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ हा सततचा दुष्काळ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. त्यामुळे सतत मराठवाड्यातील शेतकरी हे कर्जाच्या विळख्यात अडकलेले असतात. कधी सावकारी कर्ज तर कधी बँकांचे कर्ज घेऊनच शेती करावी लागते. जे उत्पन्न होतं त्या उत्पन्नातून खर्चही भागत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे. त्यामुळेच जरी शेती मशागतीसाठी पर्यायी व्यवस्था आणि यंत्रसामग्री अनेक शेतकरी वापरत असले तरी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना भाड्याने ट्रॅक्टर आणि इतर यंत्रसामग्री वापरणं परवडणार नाही. त्याचबरोबर बैल कामासाठीही दिवसाला मोठा खर्च अल्पभूधारक शेतकऱ्याला परवडणारा नाही. परिणामी स्वतःच ओताला जुंपून घेत आंतर मशागत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावत आहे. 

बैलाच्या किमतीही वाढल्या चाऱ्याचा प्रश्न आणि जनावरांच्या संभाळण्याची कसरत या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना बैल जोडी परवडत नाही अशी परिस्थिती आहे. शेतीमध्ये निघणार उत्पन्न हे घर सांभाळणे इतकही नाही त्यामुळे बैल जोडी आणि पाळीव प्राणी शेतकऱ्यांना शक्य नाही परिणामी अंतर मशागत करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे बैल जोड्या नाहीत त्यामुळे स्वतःच बैलाच्या जागी ओताला जुंपून घेण्याची वेळ शेतकऱ्यावर येत आहे. 

Advertisement

आंतरमशागतीसाठी शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पावलं उचलले पाहिजेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यावरती कर्जांचा डोंगर आहे कर्ज माफ करू असं सरकारकडून सांगण्यात येतं मात्र कर्जमाफी होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांवरती कर्जाचा बोजा वाढत आहे आणि म्हणून शेतकरी पैसे वाचवण्यासाठी स्वतःच औताला जंपून घेत असल्याचे चित्र लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय. पवार दांपत्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर याचे पडसाद विधानभवनापर्यंत पाहायला मिळाले त्यानंतर पवार दांपत्याला मदत ही मिळाली मात्र असे अनेक पवार दांपत्य लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात आहेत यांचाही विचार सरकारने करायला हवा आणि सर्वांपर्यंत अंतर मशागतीसाठी काही सार्वत्रिक उपाययोजना करता येतील का याकडे सरकारने ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे 

Advertisement
Topics mentioned in this article