विष्णू बुरगे, लातूर
सार्वजनिक जीवनात किंवा राजकारणात प्रवेश केल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या संपत्तीत मोठी वाढ होत असल्याच्या चर्चा आपण नेहमी ऐकतो. मात्र, लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी याच्या अगदी उलट आणि धक्कादायक वक्तव्य केले आहे. "खासदारकीमुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे," असे उघड वक्तव्य त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले असून, सध्या मराठवाड्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात याचीच चर्चा रंगली आहे. व्यवसायाने नेत्ररोग तज्ज्ञ असलेल्या डॉ. काळगे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना वैयक्तिक व्यवसायावर कसा परिणाम होतो, हे आकडेवारीसह मांडले आहे.
आयकराची आकडेवारी केली जाहीर
आपल्या वैद्यकीय व्यवसायाचा आणि उत्पन्नाचा आलेख मांडताना डॉ. शिवाजी काळगे यांनी दोन आर्थिक वर्षांतील आयकराची थेट तुलना केली. आर्थिक वर्ष 2023-24: खासदार होण्यापूर्वी डॉक्टर म्हणून पूर्णवेळ काम करत असताना त्यांनी सुमारे 36 लाख रुपये इतका मोठा आयकर भरला होता. आर्थिक वर्ष 2024-25 खासदार झाल्यानंतर उत्पन्न कमालीचे घटल्यामुळे त्यांना केवळ साडेआठ लाख रुपयांच्या आसपास आयकर भरावा लागला.
(नक्की वाचा- Pune-Shirdi Railway: साईभक्तांसाठी खुशखबर! पुणे-शिर्डी पहिली थेट रेल्वे सेवा 17 जूनपासून सुरू)
"डॉक्टर म्हणून व्यवसाय करत असताना नियमितपणे रुग्णसेवा करता येत होती आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र, खासदार झाल्यानंतर मतदारसंघातील कामे, सततचा जनसंपर्क, विविध प्रशासकीय बैठका आणि दिल्लीतील संसदीय कामकाजामुळे वैद्यकीय व्यवसायासाठी पूर्वीइतका वेळ देणे आता अजिबात शक्य होत नाही", असं देखील डॉ. शिवाजी काळगे यांनी म्हटलं.
'वैद्यकीय व्यवसाय विरुद्ध लोकसेवा' अशी तडजोड
डॉ. शिवाजी काळगे यांनी लातूर आणि संपूर्ण मराठवाड्यात एक नामांकित आणि विश्वासार्ह नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून अनेक वर्षे वैद्यकीय सेवा दिली आहे. याच सामाजिक आणि वैद्यकीय कामाच्या शिदोरीवर त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघातून विजय मिळवला.
(नक्की वाचा- School Time: राज्यातील शाळांची वेळ बदलणार? ॲक्टिव्ह टीचर्स फोरमने शिक्षणमंत्र्यांकडे काय केली मागणी?)
आपल्या वक्तव्यात त्यांनी पुढे स्पष्ट केले की, खासदारकी हे केवळ एक पद नसून ती जनतेने दिलेली मोठी जबाबदारी आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवणे, विकासकामांचा आणि केंद्र-राज्य शासनाच्या योजनांचा पाठपुरावा करणे यासाठी सतत उपलब्ध राहावे लागते. डॉक्टर म्हणून रुग्णांकडून मिळणारे आर्थिक उत्पन्न नक्कीच कमी झाले आहे, पण जनतेची सेवा करण्याची मिळालेली ही संधी पैशांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, त्यांच्या या जाहीर कबुलीवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नागरिकांनी त्यांच्या या प्रामाणिकपणाचे आणि पारदर्शकतेचे कौतुक केले आहे, तर काहींनी यावर राजकीय प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकप्रतिनिधी झाल्यानंतर वैयक्तिक व्यवसायावर होणारा परिणाम आणि लोकसेवेसाठी द्यावा लागणारा वेळ यावर आता एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.