विष्णू बुरगे, प्रतिनिधी
Latur News: लातूर शहरातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एक नंबर चौक परिसरातील प्रसिद्ध एम. जे. हॉस्पिटलचे नामांकित डॉक्टर मेहुल ईश्वर राठोड यांनी आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे, तर संपूर्ण लातूर शहरात प्रचंड शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोण होते डॉ. राठोड?
डॉक्टर मेहुल राठोड हे लातूरमधील बर्शी रोड परिसरातील एक अत्यंत प्रतिष्ठित इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणजेच हृदयरोग तज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्याकडे एमडी आणि डीएनबी अशा उच्च वैद्यकीय पदव्या होत्या. गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते.
बार्शी रोड येथील एम. जे. हॉस्पिटल क्लिनिकमध्ये ते रुग्णांना हृदयविकाराचे अचूक निदान आणि उपचारांची सेवा देत होते. अत्यंत गुंतागुंतीच्या हृदयविकारांवर आधुनिक आणि सुटसुटीत पद्धतीने उपचार करण्यात त्यांचा हातखंडा होता, ज्यामुळे लातूरमधील एक अत्यंत विश्वासू डॉक्टर म्हणून त्यांची मोठी ख्याती होती.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीत मोठी कारवाई! ZP ची बनावट परवानगी मिळवून बांधली इमारत; शिंदे सेनेच्या 2 नेत्यांना अटक )
मनमिळावू स्वभावामुळे रुग्णांमध्ये होते लोकप्रिय
डॉक्टर राठोड हे त्यांच्या वैद्यकीय कौशल्यासोबतच अत्यंत मनमिळावू आणि संवेदनशील स्वभावासाठी संपूर्ण शहरात परिचित होते. त्यांनी अचानक घेतलेल्या या अत्यंत टोकाच्या निर्णयामुळे त्यांचे सहकारी डॉक्टर, त्यांचे रुग्ण आणि सामान्य नागरिकांना खूप मोठा धक्का बसला आहे.
आत्महत्येचे कारण काय?
डॉक्टर मेहुल राठोड यांनी हे पाऊल नेमके का उचलले, याचे कारण अजूनही समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी तातडीने रुग्णालयात आणि घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून रीतसर पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
या खळबळजनक प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून अत्यंत वेगाने सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे का, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कामाचा मानसिक तणाव, कौटुंबिक कारण की इतर काही वेगळी पार्श्वभूमी आहे, याचा शोध पोलीस घेत असून सखोल तपासानंतरच आत्महत्येचे खरे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.