त्रिशरण मोहगावकर
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या थोडगा गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. काल रात्री हा पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे या भागातील शेती पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर दोन घरातील संसार वाहून गेला आहे. अंगावरच्या कपड्यांसह या कुटुंबाना जीव वाचवण्यासाठी घरातून पळ काढावा लागला. या घरांच्या बाजूला असलेल्या घरांनाही पावसाचा फटका बसला आहे.
या घरातील अन्नधान्य, कपडे आणि इतर संसार सुद्धा पाण्याने अक्षरशः भिजून गेल्याची परिस्थिती आता पाहायला मिळत आहे. या पुराच्या पाण्यामुळे दोन संसार, दोन कुटुंब आज रस्त्यावर आल्याचं चित्र आहे. तर या कुटुंबातील महिलांना अश्रू अनावर झाल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या ओढ्यावर उभा करण्यात आलेला हा पूल आवश्यकतेपेक्षा कमी उंचीचा आणि कमी लांबीचा बनवला गेल्यामुळे गावावर ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप होत आहे.
गावाचे माजी सरपंच शिवाजीराव खांडेकर यांनी हा आरोप केला आहे. दरम्यान गावामध्ये असलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता हे सुद्धा दाखल झाले आहेत. आता गाव गावातील नागरिकांकडून या पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. मात्र तो प्रयत्न निष्फळ ठरत आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने नाल्याला ही पाणी मोठ्या प्रमाणात आहेत.
दरम्यान ज्या कुटुंबाचं नुकसान झालं आहे त्यांनी मदतीची याचना सरकारकडे केली आहे. आमचा संसार रस्त्यावर आला. होतं नव्हतं ते सर्व पुराच्या पाण्यात वाहून गेलं आहे. त्यामुळे आता आम्हाला आधाराची गरज आहे असं त्यांनी सांगितलं.गावात एक नाला आहे. त्यावर बांधलेल्या पूलामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. याबाबत आपण वारंवार तक्रार केल्याचे सरपंचानेही सांगितले. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचं ते यावेळी म्हणाले.