Leopard Terror: बिबट्याच्या बंदोबस्तासाठी संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको; मुंबई–आग्रा महामार्ग ठप्प

Leopard Terror in Dhule: धुळे जिल्ह्यातल्या  शिंदखेडा तालुक्यातील वर्षी परिसरात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी पुरता हादरला आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
Leopard Terror in Dhule: या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
मुंबई:

नागिंद मोरे, प्रतिनिधी

Leopard Terror in Dhule: धुळे जिल्ह्यातल्या  शिंदखेडा तालुक्यातील वर्षी परिसरात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी पुरता हादरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. वनविभागाच्या सुस्त कारभारावर संताप व्यक्त करण्यासाठी शेतकरी थेट रस्त्यावर उतरले आहेत. बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा या मागणीसाठी मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

जिल्हा परिषद माजी सदस्य ललित वारुडे आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत

वर्षी आणि आसपासच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. यामुळे शेतात कामासाठी जाणे किंवा जनावरांना चारा छावणीत नेणे कठीण झाले आहे. दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार वनविभागाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

वनविभागाच्या या दुर्लक्षामुळेच अखेर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत कमखेडा फाटा येथे महामार्ग रोखून धरला.

( नक्की वाचा : Ambernath Nagarparishad Election 2025: लग्नाचे वऱ्हाड की बोगस मतदार? अंबरनाथमधील त्या 208 महिलांचे गुपित काय? )
 

रात्रीच्या वीजपुरवठ्याने धोक्यात भर

शेतकऱ्यांनी या आंदोलनादरम्यान महावितरणच्या कारभारावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या शेतीसाठी रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जात आहे. रात्रीच्या अंधारात शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर बिबट्या हल्ला करण्याची दाट शक्यता आहे. 

आपला जीव मुठीत धरून रात्री शेतात काम करणे अशक्य असल्याचे सांगत, वीजपुरवठा रात्रीऐवजी दिवसा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने न बघितल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Advertisement

महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

या आंदोलनात सुमारे 400 ते 500 शेतकरी सहभागी झाले होते. इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याने मुंबई–आग्रा महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी ठप्प झाली होती. महामार्गावर वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटर लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. प्रवाशांचे यामुळे मोठे हाल झाले. 

विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या जनसमुदायाला हाताळण्यासाठी घटनास्थळी केवळ 5 ते 6 पोलीस कर्मचारी उपस्थित होते, ज्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांची मोठी ओढाताण झाली.

Advertisement

बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावावेत आणि परिसरात गस्त वाढवावी, ही प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारावी आणि शेतीसाठी दिवसा वीज द्यावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Topics mentioned in this article