योगेश लाटकर, प्रतिनिधी
Loha Nagar Parishad 2025 Election Result : नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषद निवडणुकीच्या निकालाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून नेहमीच विरोधकांवर टीका करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. भाजपने लोहा नगर परिषदेसाठी एकाच कुटुंबातील तब्बल 6 सदस्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते, मात्र मतदारांनी या सर्वांना पूर्णपणे नाकारले आहे. या निकालामुळे जिल्ह्यात आता घराणेशाहीला थारा नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.
भाजपाचा मोठा प्रयोग फसला
लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने अतिशय वेगळा प्रयोग केला होता. पक्षाने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी दिली होती. यामध्ये गजानन सूर्यवंशी यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आली होती, तर त्यांच्या कुटुंबातील इतर पाच सदस्य वेगवेगळ्या प्रभागांमधून निवडणूक लढवत होते.
( नक्की वाचा : Ausa Nagar Parishad Result 2025 : फडणवीसांच्या 'खास' आमदाराचा 'होम ग्राऊंड'वर पराभव; औशात गुलाबी गुलालाची उधळण )
मात्र, जनतेने या घराणेशाहीच्या प्रयोगाला साफ नाकारले असून या सहाही उमेदवारांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, भाजपाने एकाच कुटुंबावर दाखवलेला हा विश्वास पक्षाच्या अंगलट आल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे.
लोह्यात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं 17 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पक्षाला प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे.
( नक्की वाचा : Tuljapur Nagar Parishad : तुळजापूरचा गड भाजपने राखला, ड्रग्ज प्रकरणाच्या आरोपांनंतरही गंगणेंनी मैदान मारलं )
असा झाला सूर्यवंशी कुटुंबाचा पराभव
नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरलेले गजानन सूर्यवंशी यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने दिलेला उमेदवार विजयी झाला आहे. गजानन सूर्यवंशी यांच्यासह त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी यांना प्रभाग 7 अ मधून उमेदवारी मिळाली होती, तिथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच गजानन यांचे भाऊ सचिन सूर्यवंशी यांना प्रभाग 1 अ मधून, त्यांच्या पत्नी सुप्रिया सूर्यवंशी यांना प्रभाग 8 अ मधून, मेव्हुणे युवराज वाघमारे यांना प्रभाग 7 ब मधून आणि भाच्याची पत्नी रिना व्यवहारे यांना प्रभाग 3 मधून उमेदवारी देण्यात आली होती. या सर्वांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे.
( नक्की वाचा : Jalna Nagar Parishad Result 2025 : जालन्यात भाजपाचे कमळ फुलले,पण दानवेंच्या भोकरदनमध्ये 'तुतारी'चा दणदणाट )
भाजपकडून सातत्याने काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांवर घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र, लोहा नगर परिषदेत भाजपने स्वतःच एकाच कुटुंबातील 6 जणांना तिकीट दिल्याने अनेकांना धक्का बसला होता. निवडणुकीच्या प्रचारात देखील हा विषय चांगलाच गाजला होता. आता निकालानंतर लोहा येथील जनतेने घराणेशाहीला नाकारले आहे. हा नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात भाजपासाठी हा मोठा इशारा मानला जात आहे.