ब्युरो रिपोर्ट
Lok Sabha Election 2024: गावागावांमध्ये जत्रा-यात्रांचा हंगाम सुरू असताना आचारसंहितेचे कारण देत तमाशाच्या कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात येत आहेत. यामुळे शेकडो कलावंत व फड मालकांसमोर बेरोजगारीचे मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. कधी दुष्काळ तर कधी कोरोना महामारी आणि आता निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तमाशा कलावंतांसमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट निर्माण झाले आहे. आचारसंहितेच्या नियमावलीमुळे तमाशा कार्यक्रमाच्या बुकिंगवर परिणाम होत असल्याने कलावंतांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
"तमाशाला सरकारने जीवदान द्यावे"
निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तमाशावर बंदी घालण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना लावणी कलाकार मंदा खेडकर यांनी म्हटले की, "आचारसंहितेमुळे आमच्या कार्यक्रमांना वेळ दिली जात नाही. रात्री 9.30 ते 10 वाजेनंतर तमाशाच्या कार्यक्रमास रंगत येते. संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रमाला कोण येणार? तमाशाचा प्रेक्षक कमी झाला आहे. तिकीट बुकिंग करून होणारे कार्यक्रम तर आता नाहीतच. जे काही कार्यक्रम सुरू आहेत, त्यावर आम्ही जगतोय. यावरही आचारसंहितेमुळे बंदी आणली गेली आहे.
रात्री 10 ते 12 वाजण्याच्या आतमध्ये कार्यक्रम बंद करण्यास आम्हाला सांगितले जाते. सरकारच्या आदेशाप्रमाणे ऐकावे लागते. पण याचा आम्हाला त्रास होत आहे. महाराष्ट्रातच तमाशा ही लोककला सुरू आहे, त्यामुळे यास सरकारने जीवदान दिले पाहिजे. तमाशा कलावंताकडे कोणाचंही लक्ष नाही. कला जीवंत राहावी, यासाठी आम्ही आमचे प्राण पणाला लावत आहोत. हे सर्व करताना आम्हाला मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. तमाशा हा पूर्णपणे कर्जामध्ये बुडाला आहे, कर्जाची परतफेड करताना आमच्या नाकीनऊ येत आहेत. यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात".
तमाशा ही कला जगवण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना अंमलात आणाव्यात, अशी मागणी तमाशा कलावंतांकडून करण्यात येत आहे.
"तमाशाच्या कार्यक्रमांनाही अनुदान द्यावे"
"तमाशाचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नाटक, सिनेमांना ज्याप्रमाणे सरकारी अनुदान मिळते. त्याच पद्धतीने तमाशाच्या कार्यक्रमांना दरवर्षी 20 ते 25 लाख रूपये अनुदान मिळावे", अशी मागणी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी केली आहे.
दरम्यान आचारसंहिता आणि लोककलेचा संबंध का जोडला जात आहे, असा प्रश्न लोककलावंत उपस्थित करत आहेत.
आणखी वाचा
5 मिनिटं उशीर अन् पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याचे स्वप्न भंग
स्टार प्रचारकांच्या यादीतून शिंदे-पवार बाहेर, भाजपने असे का केले?