राजकारण व्यवसाय नव्हे तर खूप मोठे कर्तव्य: रेणुका शहाणे

Lok Sabha Elections 2024: राजकारण, राजकीय नेते आणि मतदान प्रक्रिया यासह अन्य मुद्यावर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी काय मत मांडले आहे? वाचा सविस्तर...

Advertisement
Read Time: 4 mins

Renuka Shahane: अभिनेत्री रेणुका शहाणे आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीही त्यांनी मराठी भाषिक आणि मतदान प्रक्रियेसंदर्भात केलेले पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या पोस्टमध्ये मांडलेल्या मुद्यावर आजही ठाम असल्याचंही त्यांनी सांगितले. 'NDTV मराठी'ने सोमवारी (20 मे 2024) अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्याशी खास बातचित केली. यावेळेसही त्यांनी राजकारण, मतदानासह विविध विषयांवर आपले परखड मत मांडल्याचे पाहायला मिळते. 

(नक्की वाचा: Lok Sabha Elections 2024: बॉलिवूडकरांनी बजावला मतदानाचा हक्क)

"सजग नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडायला हवे"

मतदान प्रक्रियेसंदर्भात रेणुका शहाणे यांनी म्हटले की, "मतदान करण्यासाठी जो दिवस आपल्याला मिळतो, तो सुटीचा दिवस नसतो. सजग नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडायलाच हवे. कारण यानंतर पाच वर्षे आपण काहीही करू शकत नाही. आपण समाजमाध्यमांच्या मदतीने केवळ तक्रार नोंदवू शकतो किंवा आपल्या मागण्या मांडू शकतो. पण आपले मत व्यक्त करण्याची हीच खरी वेळ आहे. जेणेकरून देशाची दिशा बदलूही शकते किंवा जशी आहे तशीच राहू शकते. जनतेच्या मतांनुसार जे निकाल असतील ते नंतर कळतीलच. पण संविधानाने आपल्याला जो हक्क दिला आहे, तो बजावला पाहिजे", असे म्हणते रेणुकाने मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले. 

Advertisement

(नक्की वाचा: 50 हजार खर्च, 1900 किमीचा प्रवास; दुबईहून आलेल्या मतदाराच्या पदरी पडली निराशा)  

"राजकारणात सभ्यता असायला हवी"

"राजकारणात सभ्यता आली पाहिजे, असे मला वाटते. राजकारणात दरी निर्माण करण्याची परंपरा निर्माण झाली आहे. फोडाफोडीचे राजकारण आहे किंवा आपण कोणाला तरी निवडून आणले आणि त्यानंतर मात्र त्याचे वेगळेच रूप झाले. अशा अनेक घटना घडताना आपण पाहतो. आता हे सारे कुठेतरी नकोसे झाले आहे. स्वच्छ प्रतिमेचे लोक असतील, जनतेसाठी काम करणारे लोक असतील; अशा लोकांना मत द्यावेसे वाटते आणि मत देण्याची ही माझी प्रक्रिया आहे", असेही रेणुकाने सांगितले.

रेणुका शहाणेला कसे लोक राजकारणात हवे आहेत?

"राजकारणामध्ये स्वच्छ विचारांचे लोक असले पाहिजे, याकडे लोकसेवा म्हणून पाहणारे लोक हवे आहेत. जे खरंच काम करतील. कारण अनेक लोक राजकारणाकडे फक्त एक सत्ता म्हणून किंवा पावरफुल असण्यासाठी एक बिझनेस म्हणूनही याचा वापर करतात. राजकारण व्यवसाय नाही तर खूप मोठे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. ज्यामुळे देशाची दशा आणि दिशा पूर्णतः बदलू शकते. तर हे सारे काही गांभीर्याने घेणारे लोक मला राजकारणात हवे आहेत", अशी इच्छा रेणुका शहाणे यांनी बोलून दाखवली. 

(नक्की वाचा: Lok Sabha Election 2024: अक्षय कुमारपासून ते जान्हवी कपूरपर्यंत, या बॉलिवूडकरांनीही केले मतदान)

"चिखलफेक जास्त प्रमाणात होतेय"

"जेव्हा मी पहिल्यांदा मतदान केले होते. तेव्हा समाजमाध्यमे नव्हती. व्हॉट्सअ‍ॅप, इलेक्ट्रॉनिक मीडियाही इतक्या प्रमाणात नव्हते. त्या काळात आम्हाला वृत्तपत्राच्या माध्यमातूनच देशाचा हालहवाला वाचायला मिळत असे. तर त्यावेळेस एक सामान्य नागरिक आणि राजकारणामध्ये एक दरी होती, असे मला वाटते. पण आता ती दरी कमी-कमी होत चालली आहे. कारण आता समाजमाध्यमांच्या मदतीने आपण सातत्याने आपले मत नोंदवतो आणि जाब विचारत असतो, तर ही प्रक्रिया मला मनोरंजक वाटते. नक्कीच याद्वारे पाच वर्षांच्या आतच अतिशय मूलभूत बदल घडू शकतात. पण कुठेतरी चिखलफेक खूप जास्त प्रमाणात होत आहे. त्या काळात अशी परिस्थिती नव्हती. टीकाटिप्पणी होणे स्वाभाविक आहे. पण आता याचा स्तर देखील खालावला आहे. हे जर झाले नाही तर आपली जी युवा पिढी आहे, त्यांना एक निखळ राजकारण पाहायला मिळाले तर मला फार आवडेल", असे मत रेणुका शहाणे यांनी मांडले.  

"अपमान सहन करायचा नाही, स्वाभिमान असला पाहिजे" 

"आपल्या देशामध्ये विविधता आहे. जाती, धर्म, भाषा, संस्कृती अशा विविध गोष्टींमध्ये आपण विभागलो गेले आहेत. पण एक भारतीय म्हणून आपण एक आहोत आणि ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मांडलेल्या पोस्टद्वारे जो संदेश लोकांमध्ये गेला, त्यामुळे जे प्रकार घडत आहेत. ते कमी-कमी होत जातील; असे मला वाटते. मी हा मुद्दा उचलून धरला कारण आपण सहन करतो- दुर्लक्ष करतो. पण माणूस म्हणून आपण एकमेकांना सन्मान दिलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा किंवा मराठी माणसांचा अपमान का बरं करावे? हा दुजाभाव का असावा? आपल्याकडे असे काही घडत असेल तर आपण ते सहन करायला नको. स्वाभिमान असालच पाहिजे. मी एक नागरिक म्हणून यावर भाष्य केले. जे लोक मराठी लोकांचा द्वेष करतात किंवा महाराष्ट्रात राहून किंवा व्यवसाय करून मराठी भाषेचा आदर करत नाहीत. अशा लोकांना समर्थन करणारे उमेदवार असतील तर त्या उमेदवारांना मत देऊ नका, या मतावर मी आजही ठाम आहे", असे परखड विधान रेणुका शहाणेने पुन्हा मांडले. 


रेणुका शहाणे यांनी नेमके काय केले होते पोस्ट 

Photo Credit: Renunka Shahane X

VIDEO: आधी मतदानाचं कर्तव्य बजावा, नंतर सुटीचा आनंद घ्या - रेणुका शहाणे

Topics mentioned in this article