Holi Guidelines : होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या दोन्ही महत्त्वाच्या उत्सवानिमित्तानं जमावबंदी आणि हत्यारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर ध्वनीप्रदूषणावरही नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
काय आहेत सूचना?
सोशल मीडियावर धार्मिक दुखवण्यासारख्या चित्रफीती, समाजसुधारक, थोर व्यक्तीबद्दल आक्षपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. धुलिवंदनावेळी परंपरेनुसार चालत आलेल्या प्रथेनुसार दूधात काही लोक भांगमिश्रीत दूध प्राशन करतात, त्यामुळे दूध भेसळ तसेच दूध भेसळीमुळे विषबाधा होऊ शकते. त्याबाबत खबरदारी घ्यावी, अशी सूचना देण्यात आलीय.
पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोल, अॅसिड, स्फोटक पदार्थ, तलवारी, चॉपर, सूरे, अग्नीशस्त्रे यांचा साठा अनधिकृतपणे ठेवण्यावर कारवाई करण्यात यावी. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करावी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत अफवा पसरवणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवावे. मुलतत्वावादी (fundamentalist) किंवा जातीयवादी संघटनांचे नेते, कार्यकर्ते यांच्या हालचालीवर तसेच त्यांची कार्यालये, शाखा तसंच चौका चौकात लावलेले सूचना फलक इत्यादीवर जाणीवपूर्वक, जबाबदारीने आणि बारकाईने लक्ष ठेवावे.
राष्ट्रीय नेत्यांच्या पुतळयांकडे, धार्मिक स्थळांकडे/प्रार्थना स्थळांकडं, विशेषत: पहाटे विशेष लक्ष द्यावे. लोकांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीनं वर्गणी गोळा करणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून असभ्य वर्तन करणे, विभत्स हावभाव करून नाचवणे, लोकांच्या इच्छेविरूध्द रंग टाकणे, रंगाचे फुगे मारणे, मुलींची/स्त्रियांची छेडछाड करणे, शिवीगाळ, मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना देण्यात आलीय.
सर्व परिमंडळामध्ये मोक्याच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार आळीपाळीने नाकाबंदी करावी. विशेषत: बाहेरून येणाऱ्या गाड्या, काळया काचा लावलेली वाहने, डिकीमध्ये जास्त माल भरलेली वाहने यांची तपासणी करावी. नाकाबंदीसाठी तैनात करण्यात येणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी प्रत्यक्ष हजर राहून मार्गदर्शन करावे असे निर्देशही यामध्ये देण्यात आले आहेत.