जाहिरात

Lonavala Chikki: लोणावळ्याची चिक्की आता जगभर गाजणार; वाचा GI Tag मिळाल्यामुळे कसा होणार बंपर फायदा?

Lonavala Chikki GI Tag: तब्बल 100 वर्षांहून अधिक काळाची परंपरा असलेल्या या गोड चवीला आता जागतिक स्तरावर अधिकृत ओळख आणि कायदेशीर संरक्षण मिळाले आहे.

Lonavala Chikki: लोणावळ्याची चिक्की आता जगभर गाजणार; वाचा GI Tag मिळाल्यामुळे कसा होणार बंपर फायदा?
Lonavala Chikki : लोणावळ्याच्या वैभवात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
लोणावळा:

सूरज कसबे, प्रतिनिधी 

Lonavala Chikki GI Tag: पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्याच्या वैभवात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. येथील हिरवेगार डोंगर, धबधबे आणि धुके अनुभवण्यासाठी येणारा प्रत्येक पर्यटक जाताना चिक्की खरेदी केल्याशिवाय राहत नाही. आता याच लोणावळ्याची ओळख असलेल्या चिक्कीला भौगोलिक निर्देशांक म्हणजेच 'जीआय टॅग' (GI Tag) मिळाला आहे. तब्बल 100 वर्षांहून अधिक काळाची परंपरा असलेल्या या गोड चवीला आता जागतिक स्तरावर अधिकृत ओळख आणि कायदेशीर संरक्षण मिळाले आहे.

कशी झाली चिक्कीला सुरुवात?

मुंबई-पुणे रेल्वेमार्गाच्या घाटाचे बांधकाम सुरू असताना तिथल्या कामगारांना झटपट ऊर्जा मिळावी म्हणून गूळ आणि शेंगदाणे एकत्र करून ही चिक्की बनवण्यास सुरुवात झाली होती. केवळ भूक भागवण्यासाठी सुरू झालेला हा पौष्टिक आणि गोड प्रवास आज थेट जागतिक स्तरावर पोहोचला आहे. दरवर्षी लोणावळ्याला भेट देणारे लाखो पर्यटक आवर्जून ही चिक्की खरेदी करतात. आज याच चिक्कीच्या अस्सल चवीवर भौगोलिक मानांकनाची अधिकृत मोहर उमटली आहे.

जीआय टॅग म्हणजे काय आणि त्याचा कसा होणार फायदा?

जीआय टॅग (Geographical Indication) म्हणजेच भौगोलिक मानांकन हे एखाद्या विशिष्ट भागातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाला दिले जाणारे कायदेशीर प्रमाणपत्र आहे. लोणावळ्याच्या चिक्कीला हा टॅग मिळाल्यामुळे आता त्याचे अनेक मोठे फायदे स्थानिक उत्पादक आणि ग्राहकांना होणार आहेत.

बनावट उत्पादनांना बसणार आळा: बाजारात लोणावळ्याच्या चिक्कीच्या नावाखाली अनेक बनावट उत्पादने विकली जातात. आता कायदेशीर संरक्षण मिळाल्यामुळे इतर कोणालाही लोणावळा चिक्की या नावाचा गैरवापर करता येणार नाही.

( नक्की वाचा : Ola Uber चे भाडे आता थेट सरकार ठरवणार, राज्य सरकारचे नवे धोरण जाहीर, वाचा सविस्तर माहिती )
 

जागतिक बाजारपेठेत मोठी संधी: या मानांकनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादनाची विश्वासार्हता वाढते. यामुळे स्थानिक उत्पादकांना थेट परदेशात निर्यात करणे सोपे होणार आहे.

ग्राहकांचा वाढणार विश्वास: ग्राहकांना आता आपण खरेदी करत असलेली चिक्की ही खरी आणि दर्जेदार लोणावळा चिक्कीच आहे, याची खात्री पटेल.

स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ: जागतिक पातळीवर मागणी वाढल्यामुळे स्थानिक उत्पादक आणि व्यापाऱ्यांना याचा थेट आर्थिक फायदा होईल, ज्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

( नक्की वाचा : Car Insurance Claim : ..तर थेट बँक खात्यात जमा होतील पैसे; कारवर झाड पडल्यास 'हे' काम करायला विसरू नका )

लोणावळ्यातील चिक्कीला मिळालेल्या या जागतिक यशामुळे स्थानिक उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या मानांकनामुळे स्थानिक ब्रँडला आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यापारी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com