राहुल तपासे, प्रतिनिधी
Mahabaleshwar News : महाराष्ट्रात असा क्वचितच कोणी असेल ज्याने महाबळेश्वरच्या थंडगार हवेचा आनंद घेतला नसेल. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महाबळेश्वर म्हणजे मिनी काश्मीरच. सुट्ट्यांच्या दिवसात मुंबई-पुण्यातून हजारो पर्यटक थेट महाबळेश्वर गाठतात. तेथील उंच डोंगर, गुलाबी थंडी, स्ट्रॉबेरीच्या बागा पाहून नागरिकांचा सर्व थकवा दूर होतो.
मात्र गेल्या काही दिवसांपासून हे महाबळेश्वर वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आलं आहे. हेच महाबळेश्वर आता हिंसक वन्यप्राण्यांमुळे धोकादायक ठरतंय का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. त्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत महाबळेश्वर परिसरातील रस्त्यांवर दिसणारे बिबटे आणि थेट घरांमध्ये शिरणारे वन्यप्राणी. याचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत.
महाबळेश्वरमध्ये चिंता वाढवणारी स्थिती?
महाबळेश्वरच्या मुख्य मार्केटपासून काही अंतरावर पाचगणी ते महाबळेश्वरला येणाऱ्या जननी माता मंदिर घाट परिसरात रस्त्याच्या कडेला एक बिबट्या बसलेला दिसला होता. काही दिवसांपूर्वी आलेल्या व्हिडिओमध्ये एक अवाढव्य जंगली गवा थेट बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरून अतिशय निवांतपणे चालताना दिसतोय. हे दृश्य जितकं थरारक आहे, तितकंच भयानकही…या गव्याला पाहून परिसरात एकच तारांबळ उडाली. हा गवा जर अधिक उग्र स्वरूपात असता, तर काय अनर्थ घडला असता. कारण या परिसरात काही अंतरावर स्ट्रॉबेरी शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला जंगली गव्याने ठार मारल्याची घटना नुकतीच घडली आहे.
महाबळेश्वरची ही मुख्य बाजारपेठ रात्री उशिरापर्यंत, सुमारे दहा वाजेपर्यंत पर्यटकांनी गजबजलेली असते. जर पर्यटकांची गर्दी असताना हा जंगली गवा येथे आला असता, तर परिस्थिती किती गंभीर झाली असती, याचीच चर्चा सध्या स्थानिकांमध्ये सुरू आहे. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेपासून काही अंतरावर सुनीला भाटिया यांच्या बंगल्यात बिबट्या घुसल्याचीही बातमी समोर आली होती.