Artificial Flowers: लग्नकार्यात सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर केल्यास होणार कारवाई; CM फडणवीसांची घोषणा

Maharashtra Ban on Artificial Flowers: लग्न सोहळे, मॅरेज हॉल्स आणि डेकोरेटर्सनी अशा फुलांचा वापर केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी लवकरच शासन निर्णय (GR) काढला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

CM Devendra Fadnavis: लग्नकार्ये आणि सार्वजनिक समारंभांमध्ये प्लॅस्टिक किंवा अविघटनशील साहित्यापासून बनवलेली कृत्रिम फुले वापरणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकार आता आक्रमक झाले आहे. विधानसभेत सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात स्पष्ट संकेत दिले आहेत. अशा फुलांमुळे केवळ पर्यावरणाचेच नुकसान होत नाही, तर नैसर्गिक फुले उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोटावरही पाय पडत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

शासन निर्णयाद्वारे येणार अधिक स्पष्टता

मुख्यमंत्री म्हणाले की, "बायोडिग्रेडेबल नसलेल्या कोणत्याही साहित्यापासून तयार केलेली कृत्रिम फुले वापरण्यावर बंदी आहे. या निर्णयाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यात स्पष्टता आणण्यासाठी नवीन शासन निर्णय (GR) काढला जाईल."  सजावट करणारे डेकोरेटर्स आणि अशा फुलांचा वापर करून सजावट करण्यास परवानगी देणारे मोठे मॅरेज हॉल्स यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. पर्यावरण विभाग याकामी पुढाकार घेईल आणि गरज पडल्यास इतर सरकारी विभागांनाही या कारवाईत सामील करून घेतले जाईल.

(नक्की वाचा-  Pune News: पुणे-लोणावळा प्रवास आता सुसाट; रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रवाशांचा वेळ वाचवणार)

25 कोटींचा दंड वसूल; पंकजा मुंडे यांनी दिली माहिती

पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी प्लास्टिक बंदीच्या कारवाईचा अहवाल सादर केला. आतापर्यंत राज्यात 4,135 टन प्लास्टिक कचरा जप्त करण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्यांकडून सुमारे 25 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जवळपास 92 हजार ठिकाणी नियमभंगाच्या घटना आढळल्या असून दोषींवर शिक्षेची कारवाई करण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  Vasai News: कार्यालयात बोलावलं, बविआच्या कार्यकर्त्याला वळ उठेपर्यंत मारलं; भाजप नगरसेवकावर गुन्हा)

पर्यावरणपूरक सजावटीला प्रोत्साहन

येणाऱ्या काळात होळी आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक रंग आणि नैसर्गिक फुलांचा वापर करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही सरकारने केले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article