प्रसाद शिंदे, प्रतिनिधी
SSC Result Maharashtra Board : शालेय आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (13 मे) जाहीर झाला आहे. राज्यातील 94.10 टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय. त्याचबरोबर परिस्थितीशी झगडत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काही जणांना घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता येत नाही. ते अगदी कमी वयात कामाला किंवा संसाराला लागतात. पण, त्यांच्या मनात आपलं शिक्षण अपुरं असल्याची अस्वस्थता असते. ही अस्वस्थता त्यांना शांत बसू देत नाही. आहिल्यानगरमधील एका वडापाव विक्रेत्या महिलेनं देखील वयाच्या 47 व्या वर्षी दहावीची परीक्षा दिली. घरातील खडतर परिस्थिती, संसारतील जबाबदारी आणि उशीरा सुरु केलेलं शिक्षण यावर मात करत त्यांनी यश मिळवलं आहे.
मंगल रंगनाथ रांधवण असं या वडापाव विक्रेत्या महिलेचं नाव आहे. त्यांचं 1994 साली राजेंद्र बोरुडे यांच्याशी लग्न झालं. संसाराचा गाडा हाकताना तसंच मुलांचा सांभाळ करताना पुढील शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत त्यांना सतावत होती. ही खंत दूर करण्यासाठी त्यांनी वयाच्या 47 व्या वर्षी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
( नक्की वाचा : SSC Result Maharashtra Board : लातूरमधील विद्यार्थ्यांची झिरो ते हिरो कामगिरी, दहावीच्या निकालानंतर होतेय चर्चा )
मंगल यांनी 'भाई सथ्था नाईट हायस्कूल' मध्ये प्रवेश घेतला. संसार आणि व्यवसाय सांभाळून शाळेला नियमित हजेरी लावून दहावीची परीक्षा दिली. 32 वर्षांच्या प्रदीर्घ अंतरानं त्या 57 टक्के मार्क्स घेऊन दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. आता यापुढील शिक्षण देखील पूर्ण करायचं आहे, हा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. त्याचबरोबर शिक्षण महत्त्वाचे असून प्रत्येकानं ते घेतलं पाहिजे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
कसा लागला दहावीचा निकाल?
यंदा राज्यातील 94.10 टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वात जास्त 99.32 टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा असून गडचिरोली जिल्ह्याचा निकाव सर्वात कमी 82.67 टक्के इतका लागला आहे.
राज्यातील 96.14 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलं उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 92.31 इतकी आहे. राज्यातील एकूण 15 लाख 58 हजार 20 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील एकूण 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.