
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अत्याचाराच्या भयंकर घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही बसमध्येच तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या भयंकर घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद राज्याच्या अधिवेशनातही पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी महिला सुरक्षेवरुन सरकारला सवाल केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले जयंत पाटील?
"स्त्रीला अभंगामध्ये पांडुरंगाचा दर्जा दिला आहे. आज आधुनिक युगातही तेच चित्र दिसते. आपण कोणत्याही संकटात आपली आई, महिला ढाल बनून लढते. महाराणी येसूबाई, राजमाता जिजाऊ,सईबाई, ताराराणी राणीसाहेब या सर्वांचे शौर्य कर्तबगारी आपण पाहिली आहे. आज काय परिस्थिती आहे, महिलांवरील अत्याचार वाढलेत. गुन्ह्याचे सर्वाधिक प्रमाण हे अल्पवयीन मुलींचे दिसत आहे," असं जयंत पाटील म्हणाले.
तसेच "हे चांगलं झालं आहे, 1500 महिलांना दिलेत. 1500 रुपयांवर तिचा महिना जाऊ शकतो. आता एकदा दिले की संपले, त्यांची संख्या कमी करु नका. आज महिला घाबरलेल्या आहेत, शिवशाही बसमध्येही एक प्रकार घडला. अनेक गोष्टी आहेत. राज्यात रेप केसची संख्या वाढतेय अत्याचार आणि हत्यांच्या गुन्हांची संख्या वाढतेय. समाजाची मानसिकता बदलणे महत्वाचे आहे, राज्य कुणाचे आहे हे जास्त महत्त्वाचं नाही, महिला दिन आहे, सरकारने गांभीर्याने घ्यावं, कडक कायदा करा, महिलांना संरक्षण देणे गरजेचे आहे. सायबर क्राईममध्येही महिलांच्या सुरक्षेबाबत कडक कायदे करावे अशी माझी मागणी आहे. कायद्याने महिलांना १०० टक्के सुरक्षित करा, तुम्ही हे काम केले तर इतिहासात नोंद होईल," असे जयंत पाटील म्हणाले.
(नक्की वाचा- Exclusive : संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर, मन सून्न करणारी माहिती समोर)
सुधीर मुनगुंटीवारही बरसले...
यावेळी बोलताना सुधीर मुनगुंटीवार यांनीही महिला सुरक्षेवरुन सरकारला घरचा आहेर दिला. "स्त्रीशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. मंत्रीमहोदय आहेत, त्या भाषण देतील. पण भाषणाने परिस्थिती बदलली असती तर दोन दोन तास भाषणे देणे सोपे आहे. आम्ही शक्तीपीठ महामार्ग करु, समृद्धी महामार्ग करु.. पण महिलांसाठी काय? स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी..पण त्या आईला दुख होईल असे वातावरण असेल तर आपण सगळे भिकारी आहोत.
"महामार्गांवर महिलांनासाठी शौचालये नाहीत. गाड्यांमध्ये पेट्रोल टाकण्याची चिंता पण आमच्या आई बहिणीची चिंता नाही. कमीतकमी शक्तीपीठावर 50 50 किलोमीटरवर शौचालय करा. समृद्धी महामार्गावर गाडीच थांबवता येत नाही, पुरुषांचे ठीक, आहे महिलांचे का? तर असे कायदे केले पाहिजेत. समाजामध्ये सामाजिक दृष्टीकोनाच्या माध्यमाने बदल केले पाहिजेत. सर्वांगिण सबलीकरणासाठी समितीने काम करावे. कामाच्या ठिकाणी भेद नको, दिलासादायक कायदे व्हावेत. असं सुधीर मुनगुंटीवार म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world