Maharashtra Nagar Parishad Exit Poll 2025 : विधानसभा निवडणुकीनंतर बरोबर 1 वर्षाने राज्यात सर्वात मोठी निवडणूक आज (20 डिसेंबर 2025) पार पडली. गेल्या दीड महिन्यांपासून राज्यातील 287 नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांनी संपूर्ण मैदान गाजवले होते. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून उद्या(रविवार, 21 डिसेंबर 2025) या निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. त्यापूर्वी ज्युबिलंट डाटा स्टुडिओने केलेला एक्झिट पोल जाहीर झाला आहे. या एक्झिट पोलमधून राज्यातील मतदारांचा कौल समोर आला आहे.
भाजपाची मोठी आघाडी
ज्युबिलंट डाटा स्टुडिओच्या एक्झिट पोलनुसार, राज्यातील 5 विभागांमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र आहे. पाचही विभागांमध्ये महायुतीचा मोठा बोलबाला असून महाविकास आघाडीला मात्र तीन अंकी आकडा गाठणे कठीण जाणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे.
( नक्की वाचा : Mahapalika Elections 2026 : ठाकरे एकत्र आले तरी टेन्शन नाही! बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, भाजपाचा प्लॅन काय? )
मराठवाड्यात भाजपच्या एकतर्फी विजयाचा अंदाज
मराठवाडा विभागातील आकडेवारी पाहता, तिथे भाजपच्या विजयाचा एकतर्फी अंदाज वर्तवण्यात आला आहे. विभागातील एकूण 52 पैकी 22 जागांवर भाजपचा नगराध्यक्ष निवडून येण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेचे 6 तर राष्ट्रवादीचे 9 नगराध्यक्ष निवडून येऊ शकतात. काँग्रेसला 7, ठाकरे गटाला 3 आणि शरद पवार गटाला केवळ 1 नगराध्यक्ष पदावर समाधान मानावे लागेल असे हे सर्वेक्षण सांगते.
पश्चिम महाराष्ट्रात कुणाचे किती बळ?
पश्चिम महाराष्ट्रातील 71 नगरपरिषदांपैकी 27 जागांवर भाजपचा झेंडा फडकताना दिसत आहे. अजित पवार गटाला या ठिकाणी 12 नगरपालिकांमध्ये आपले नगराध्यक्ष बसवण्यात यश मिळू शकते. शिंदे गटाचे 7 नगराध्यक्ष विजयी होण्याचा अंदाज आहे. मात्र, या भागात शरद पवार गटाला केवळ 2 तर काँग्रेस आणि ठाकरे गटाला प्रत्येकी 1 जागेवर यश मिळण्याची शक्यता आहे. इतर उमेदवारांनी 21 जागांवर आघाडी घेतल्याचे दिसते.
( नक्की वाचा : Pune News : पुण्यात भाजपाचा धमाका!सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयाने सोडली साथ; पाहा कुणाकुणाचा पक्षात प्रवेश )
कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काय होणार?
कोकणात भाजप आणि शिवसेनेला बहुमताचा अंदाज असून दोन्ही पक्ष प्रत्येकी 10 जागांवर विजयी होऊ शकतात. दोन्ही राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 जागा मिळेल, मात्र ठाकरे गट आणि काँग्रेसला कोकणात सपशेल अपयशाचा सामना करावा लागू शकतो. उत्तर महाराष्ट्रातील 37 जागांपैकी भाजपला 24, शिवसेनेला 7, अजित पवार गटाला 3 आणि ठाकरे गटाला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. या विभागात काँग्रेस आणि शरद पवार गटाचे खाते उघडणेही कठीण दिसत आहे.
कसे झाले सर्वेक्षण?
हे सर्वेक्षण करण्यासाठी ज्युबिलंट डाटा स्टुडिओने दोन टप्प्यांत काम केले. पहिला टप्पा निवडणूक प्रक्रियेदरम्यान पार पडला, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी राबवण्यात आला. 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या काळात हे काम सुरू होते. यासाठी मोबाईल आणि ए.आय. आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून 4,36,378 लोकांशी थेट संवाद साधला गेला. राज्याच्या 6 विभागांमधील 176 तालुक्यांमध्ये हे सर्वेक्षण झाले असून याचा एकूण सँम्पल साईज 11,84,959 इतका मोठा आहे.