जाहिरात

Mahapalika Elections 2026 : ठाकरे एकत्र आले तरी टेन्शन नाही! बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, भाजपाचा प्लॅन काय?

Mahapalika Election 2026 : महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगत असतानाच, भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

Mahapalika Elections 2026 : ठाकरे एकत्र आले तरी टेन्शन नाही! बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, भाजपाचा प्लॅन काय?
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Mahapalika Elections 2026 : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगत असतानाच, भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

कितीही आघाड्या झाल्या किंवा नवीन समीकरणं जुळली तरी राज्याची जनता केवळ भाजपा आणि महायुतीच्याच पाठीशी ठामपणे उभी आहे, असा विश्वास भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. अकोला येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांच्या रणनीतीवर जोरदार निशाणा साधला.

कितीही आघाड्या झाल्या तरी फरक पडणार नाही

मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपाच्या गोटात कोणतीही अस्वस्थता नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीचा दाखला देताना ते म्हणाले की, त्या वेळी 20 पेक्षा जास्त पक्ष एकत्र आले होते, तरीही भाजपा डगमगली नाही. 

उलट भाजपाने 51 टक्के मतदान मिळवून दणदणीत यश संपादन केले होते. राजकारणात किती पक्ष, नेते किंवा गट एकत्र येतात यापेक्षा जनता कोणाच्या बाजूने आहे हे महत्त्वाचे असते. सध्या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजिन सरकारवर जनतेचा पूर्ण विश्वास असून आगामी निवडणुकांमध्येही हाच कौल पाहायला मिळेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

( नक्की वाचा : Pune News : पुण्यात भाजपाचा धमाका!सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयाने सोडली साथ; पाहा कुणाकुणाचा पक्षात प्रवेश )

निवडणुकांसाठी महायुतीची विशेष रणनीती

महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीने आतापासूनच कंबर कसली आहे. प्रत्येक महापालिकेसाठी पाच जणांची एक विशेष टीम तयार करण्यात आली असून, ही टीम निवडणूक व्यवस्थापन, प्रचार आणि संघटनेचे काम पाहणार आहे. बावनकुळे यांनी सांगितले की, भाजपाची कार्यपद्धती ही संयमी असून आम्ही विजयाचा उन्माद करत नाही आणि पराभवाने खचूनही जात नाही. 

आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीला सर्वाधिक बहुमत मिळेल, असा दावाही त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्ष देखील आपल्या ताकदीवर पूर्ण ताकदीने निवडणुका जिंकतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महायुतीतीमधील मतभेदांवर स्पष्टीकरण

महायुतीमधील घटक पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे बावनकुळे यांनी आवर्जून सांगितले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचे निर्णय हे त्यांचे वैयक्तिक अधिकार आहेत आणि त्यामध्ये भाजपा हस्तक्षेप करत नाही. काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, पण त्यातून मित्रपक्षांमध्ये कोणतेही मनभेद निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल असेही ते म्हणाले. भाजपा आणि महायुती पूर्ण आत्मविश्वासाने मैदानात उतरणार असून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरोपांवर निवडणूक आयोग निर्णय घेईल

नांदेडमध्ये भाजपा आमदारांवर झालेल्या मतदार फोडल्याच्या आरोपांवर विचारले असता, बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळून लावले. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे आरोप होणे ही सामान्य बाब असून त्याचा निकालावर कोणताही परिणाम होत नाही, असे ते म्हणाले. या प्रकरणाची तक्रार झाली असल्यास राज्य निवडणूक आयोग त्याची चौकशी करेल आणि जो काही निर्णय असेल तो आयोग घेईल, असे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com