Vidhan Parishad Election 2026: राज्याच्या राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीची चर्चा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अनपेक्षितपणे अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यानंतर काँग्रेसनंही आपला स्वतंत्र उमेदवार देण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झालंय. पण ही निवडणूक नक्की होते कशी? आमदारांना मतदान करताना नेमकं काय गणित जुळवावं लागतं आणि विजयासाठी किती मतांची गरज असते, हे समजून घेणं रंजक ठरणार आहे.
कशी होते विधान परिषदेची निवडणूक?
विधान परिषदेची निवडणूक ही आपण सामान्यपणे पाहतो तशी थेट जनतेतून होणारी निवडणूक नसते. ही एक अप्रत्यक्ष मतदान पद्धत आहे. यात सामान्य नागरिक मतदान करत नाहीत, तर आपण निवडून दिलेले विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार मतदान करतात. या पद्धतीला 'प्रमाणशीर प्रतिनिधित्व' असं म्हटलं जातं. यात प्रत्येक मतदाराला (आमदाराला) पसंतीक्रमानुसार मत देण्याचा अधिकार असतो.
विजयासाठीचा 'मॅजिक नंबर' किंवा कोटा किती?
विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला एका विशिष्ट मतांचा आकडा गाठावा लागतो, त्यालाच 'कोटा' असं म्हणतात. हा कोटा काढण्याचं एक ठराविक सूत्र असतं. सध्याच्या परिस्थितीनुसार हे गणित कसं आहे ते पाहूया. विधानसभेतील एकूण सदस्य संख्या 288 आहे. हे गणित मांडताना एकूण आमदार संख्या गुणिले 100, त्याला भागिले निवडणुकीच्या जागा (10) अधिक 1 असं केलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं तर, सध्याच्या संख्याबळानुसार एका जागेसाठी किमान 29 मतांची आवश्यकता आहे. म्हणजेच ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 29 मतं मिळतील, तो विजयी घोषित केला जातो.
( नक्की वाचा : Sanjay Raut: ठाकरेंचा राऊतांना 'चेक मेट'! आदित्य ठाकरेंनी निर्णय फिरवला आणि संजय राऊतांचा पत्ता कट झाला? )
महायुतीचं पारडं जड; कोणाकडे किती संख्याबळ?
सध्याच्या विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहिलं तर महायुतीकडे स्पष्ट बहुमत दिसत आहे. भाजपचे 131 आमदार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत. या एकूण संख्याबळामुळे महायुतीचे किमान 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. महायुतीकडे अतिरिक्त मतं देखील असल्याने ते शेवटच्या जागांसाठी मोठी ओढाताण करू शकतात.
महाविकास आघाडीपुढील पेच आणि दानवेंची उमेदवारी
दुसरीकडे महाविकास आघाडीकडे सध्या एकूण 46 आमदारांचे संख्याबळ आहे. विजयासाठी 29 मतांची गरज असताना आघाडीने जर एकच उमेदवार दिला, तर तो उमेदवार आरामात निवडून येऊ शकतो. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केली आहे आणि काँग्रेसनेही स्वतंत्र उमेदवाराची तयारी दर्शवली आहे. जर आघाडीकडून दोन उमेदवार रिंगणात राहिले, तर दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागेल.
(नक्की वाचा : Exit Poll 2026: बंगालमध्ये दीदींचा गड कोसळणार की भाजपाचं कमळ फुलणार? पाहा सर्व एक्झिट पोलची आकडेवारी )
घोडेबाजार आणि पसंतीक्रमाची मतं
जेव्हा उमेदवार संख्याबळापेक्षा जास्त असतात, तेव्हा खरी चुरस निर्माण होते. पहिल्या पसंतीची मतं कोणाला मिळतात आणि दुसऱ्या पसंतीची मतं कोणाकडे वळतात, यावर शेवटच्या उमेदवाराचा विजय अवलंबून असतो. याच काळात राजकीय पक्षांमध्ये आमदारांची पळवापळवी किंवा 'घोडेबाजार' होण्याची शक्यता असते. त्यामुळेच विधान परिषदेची ही निवडणूक केवळ मतांची नसून ती राजकीय चाणाक्षपणाची आणि बेरजेच्या राजकारणाची ठरत आहे.