Vidhan Parishad Election 2026: राज्याच्या राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. 10 जागांसाठी होणाऱ्या या लढतीत अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस उरला असताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. ही निवडणूक स्वतः उद्धव ठाकरे लढवणार अशी चर्चा रंगलेली असतानाच, आदित्य ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात दोन मोठे संदेश गेले आहेत. एकीकडे सामान्य शिवसैनिकाला ताकद देण्याचा प्रयत्न दिसतोय, तर दुसरीकडे पक्षात संजय राऊत यांचा शब्द अंतिम नाही, हेच यातून अधोरेखित झाले आहे.
महाविकास आघाडीत पेच आणि ठाकरेंची खेळी
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले 6 उमेदवार मैदानात उतरवल्यानंतर ठाकरे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक लढवणार अशी शक्यता वर्तवली जात होती आणि त्याला काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला होता. मात्र, ठाकरे गटाकडे स्वतःचा उमेदवार निवडून आणण्याइतपत संख्याबळ नसल्याने ही निवडणूक मित्रपक्षांच्या जीवावर लढावी लागणार आहे. अशा कठीण परिस्थितीत अंबादास दानवे यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला पुन्हा मैदानात उतरवून ठाकरेंनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.
संजय राऊतांच्या वर्चस्वाला लगाम
गेल्या काही वर्षांपासून संजय राऊत हेच ठाकरे गटाचा चेहरा आणि धोरण ठरवणारे प्रमुख नेते राहिले आहेत. महाविकास आघाडीच्या स्थापनेत त्यांची भूमिका महत्त्वाची होती आणि त्यानंतर पक्षातील त्यांचे वजनही प्रचंड वाढले होते. या निवडणुकीतही उद्धव ठाकरेंनीच उभे राहावे यासाठी राऊत कमालीचे आग्रही होते. अगदी उमेदवारी जाहीर होण्याच्या काही तास आधीपर्यंत राऊत माध्यमांसमोर उद्धव ठाकरेंच्या नावाबद्दल ठामपणे बोलत होते. मात्र, आदित्य ठाकरेंनी दानवेंचे नाव जाहीर करून राऊतांना मोठा राजकीय शह दिल्याची चर्चा आता रंगली आहे.
( नक्की वाचा : Sanjay Bhende: भाजपाने विधान परिषदेची उमेदवारी दिली ते 'भेंडे मास्तर'कोण ? ; गडकरींचे 'चाणक्य' आता सभागृहात! )
पक्षात आता ठाकरेंचाच शब्द अंतिम
आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला असला तरी, महाविकास आघाडीतील दरी मात्र उघड झाली आहे. काँग्रेसने आता आपला स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. आदित्य ठाकरे हे आगामी काळात पक्षाचे कार्याध्यक्ष होणार असल्याची चर्चा आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला निर्णय लावून धरत पक्षात आता ठाकरेंचाच शब्द निर्णायक असल्याचे दाखवून दिले आहे. राऊत जे बोलतात तेच पक्षाचे धोरण नसते, हे या निमित्ताने स्पष्ट झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
निवडणुकीचे गणित आणि पुढील वाटचाल
राज्यात 12 मे रोजी या 10 जागांसाठी मतदान होणार असून 30 एप्रिल हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अंबादास दानवे यांच्या उमेदवारीमुळे आता महाविकास आघाडीतील इतर पक्ष काय भूमिका घेतात, यावर सर्व गणिते अवलंबून असतील. मात्र, या एका निर्णयाने ठाकरे गटातील अंतर्गत समीकरणे बदलली असून आदित्य ठाकरेंनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world