मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या गाठीभेटी वाढल्याचे दिसत आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत महत्त्वाचे विधान केले ज्यानंतर राज्याच्या राजकारणात काका पुतण्यांच्या मनोमिलनाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवार यांच्या या भूमिकेवरुनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सर्वात मोठे विधान केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले संजय राऊत?
"भारत- पाकिस्तानमध्ये चर्चा होऊ शकते. ट्रम्प आणि मोदिमध्ये चर्चा होऊ शकतात तर पवारांमधील चर्चा ही लहान गोष्ट आहे. शरद पवार अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे ट्राय पार्टी एग्रीमेंट काय आहे हे बघावं लागेल. मधल्या काळात आम्हाला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंबाबत वाटलं होतं की संघर्ष सुरु राहील. आमचाही संघर्ष सुरु आहे. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांनी मधल्या काळामध्ये शरद पवार यांचा जो अपमान केला आहे, अपमानास्पद वक्तव्ये केली आहेत, त्याची खंत आम्हाला वाटते. आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो नसतो," असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले.
तसेच "शरद पवार आणि आमच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे चेले आहोत. आम्ही फटे लेकीन हटे नही या भूमिकेतले आहोत. आम्ही सत्तेची आणि संस्थांची पर्वा करत नाही. नेशन फर्स्ट, स्टेट फर्स्ट ही भूमिका आमची जरुर आहे पण आमच्या संस्था, कारखाने टिकावेत यासाठी आमचे राजकारण नाही. आमचे राजकारण गरीब फाटक्या लोकांसाठी आहे.." असेही संजय राऊत म्हणाले.
नक्की वाचा - Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार
तसेच "जे येतील ते आमच्याबरोबर नाहीतर त्यांच्याशिवाय हा वीर सावरकरांचा मंत्र आहे तो आम्ही अवलंबतो. आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय. आम्ही संघर्ष करणार आहोत. या देशामध्ये लादलेल्या हुकूमशाहीविरोधात, ज्यांनी आमचे पक्ष फोडले, ज्यांनी हा महाराष्ट्र कंगाल केला त्यांच्याशी आमचा संघर्ष सुरुच आहे. यामध्ये ते येतील त्यांच्यासोबत नाहीतर त्यांच्याशिवाय आमचा संघर्ष सुरुच असेल..," असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला.