बुलढाणा: शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. राहुल गांधींबद्दल केलेले जीभ छाटण्याचे विधान असो किंवा तलवारीने केक कापने असो.. संजय गायकवाड नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात. सध्या त्यांनी महाराष्ट्र पोलिसांवर केलेले एक विधान चर्चेत आले असून यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणालेत संजय गायकवाड?
महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात अस म्हणत गायकवाड यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारने जर एखादी कायदा बनवला तर पोलिसांना एक हप्ता वाढून जातो. गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो... असे धक्कादायक विधान संजय गायकवाड यांनी केले.
सरकारने जर एखादी कायदा बनवला तर पोलिसांना एक हप्ता वाढून जातो. गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, जर पोलिसांनी ठरवलं की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही. तर सगळं सुतासारखं सरळ होईल, असे म्हणत माझ्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाच्या पहाडाला पार करावं लागेल.. असा इशाराही संजय गायकवाड यांनी दिला.
दरम्यान, माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली कुठेही तपास झाला नाही. त्यामुळं पोलीस हे अकार्यक्षम असून बुलढाण्यातील दोन पोलीस हे चोरांचे सरदार असून चोरीचा माल पोलिसांच्या घरात आढळतोच कसा? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातील पोलीस दलाबाबत असे विधान केल्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे.