जाहिरात

Omraje Nimbalkar: ओमराजेंनी ठाकरेंची साथ का सोडली? 'मातोश्री'च्या कट्टर शिलेदारावर ही वेळ का आली?

जिल्हा परिषद निवडणुकीत ओमराजेंना 55 पैकी फक्त 6 गटात यश मिळालं. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून राणा पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील बसल्या.

Omraje Nimbalkar: ओमराजेंनी ठाकरेंची साथ का सोडली? 'मातोश्री'च्या कट्टर शिलेदारावर ही वेळ का आली?

सागर जोशी, मुंबई:

Omraje Nimbalkar:  शिवसेना ठाकरे गट सोडून शिंदे गटात गेलेल्या खासदार ओमराजे निंबाळकरांना सध्या प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. अर्थात हे सगळं काही सोशल मीडियावर सुरु आहे. त्यांचे फॉलोअर्स 15 हजारांनी कमी झाले वगैरे. पण हे फॉलोअर्स त्यांच्या मतदारसंघातील आहेत का? मधल्या काळात त्यांचा चाहता वर्ग महाराष्ट्रभरात प्रचंड प्रमाणात वाढला होता. अनफॉलो करणारे त्यातीलच काहीजण असावेत. एक नक्की की ओमराजे यांच्याकडून त्यांच्या अधिक (+) शिवसेना ठाकरे गटाच्या समर्थकांना अशी अपेक्षा नव्हती.

Navi Mumbai: नवी मुंबईत खळबळ! 75 कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त, 'त्या' शिपिंग कंपनीचा कोट्यवधींचा काळा कारनामा

ओमराजेंनी ठाकरेंची साथ का सोडली?

कारण 2009 मध्ये ओमराजेंना पहिल्यांदा आमदार करणारी हीच शिवसेना होती. त्यापूर्वी ओमराजे निंबाळकर यांची मतदारसंघात फारशी ओळख नव्हती. पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र इतकीच काय ती तेव्हाची त्यांची ओळख. पण पद्मसिंह पाटलांना शह देऊ शकणाऱ्या पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांच्यावर मोठी जबाबदारी आली. एकीकडे न्यायालयीन लढाई आणि दुसरीकडे राजकीय लढाई अशा दोन पातळ्यांवर त्यांचा संघर्ष सुरु झाला होता. समोर जिल्ह्यात अगदी सिंहाची ताकद असलेला विरोधक होता. 

पवनराजे यांच्या हत्येनंतर ओमराजे यांनी सक्रीय राजकारणात एन्ट्री घेतली. सहानुभूतीची लाट होतीच. वयाच्या 23 व्या वर्षी नेतृत्व करत त्यांनी धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तापालट घडवून आणलं. काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करत त्यांनी 2009 ची विधानसभा निवडणूक लढवली. पद्मसिंह पाटील यांचा 16 हजारापेक्षा जास्त मताने पराभव करत ओमराजे पहिल्यांदा आमदार बनले. पुढे 2014 मध्ये राणा पाटलांनी ओमराजेंना पराभवाची धूळ चारली होती. 10 हजार 806 मतांनी राणा पाटील विजयी झाले.

ओमराजे निंबाळकर यांनी 2019 लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राणाजगजितसिंह पाटील यांचा 1 लाख 27 हजार मतांनी पराभव केला. तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजेंनी राणा पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा तब्बल 3 लाख 29 हजारपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. अशाप्रकारे पाटील कुटुंबातील तिघांना ओमराजे यांनी पराभवाची धूळ चारली आहे. हे सगळं शक्य झालं त्यांच्या पाठीमागच्या शिवसेनेच्या बॅनरमुळे. कारण धाराशिवचा मतदार हा कायम शिवसेनेच्या पाठिशी राहिला आहे. 

जून 2022 मध्ये शिवसेना फुटली. पण ओमराजेंच्या साथीनं कळंब-धाराशिव विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या कैलास पाटलांनी अर्ध्या रस्त्यातून माघारी येत आपली आणि आपल्या मित्राची ठाकरेंप्रति असलेली निष्ठा दाखवून दिली. त्यावेळी कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर धाराशिव आणि पर्यायानं राज्यात हिरो ठरले होते. पुढे 2024 च्या निवडणुकीत त्याच निष्ठेच्या बळावर ही जोडगोळी मोठ्या फरकानं पुन्हा आमदार आणि खासदार बनली. पण आज मात्र या निष्ठेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. बंडखोर 6 खासदारांमध्ये ओमराजेंचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं. त्यातच लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात दोन खासदारांची स्वाक्षरी नाही आणि त्यात एक ओमराजे आहेत, असं बोललं जात असल्यानं त्यांनी ठाकरेंची साथ सोडली की नाही? असा मोठा संभ्रम त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यात मी सध्या पुण्यात आले दिल्लीला गेलो नाही, यापलीकडे ओमराजे पुढे येऊन काहीही बोलायला तयार नाहीत. 

ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंशी बंडखोरी केल्याच्या दाव्यानं सोशल मीडियात त्यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. याच सोशल मीडियावर ओमराजे चांगलेच फेमस आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांना फॉलो करणारा एक मोठा वर्ग आहे. राजकारणासोबत त्यांच्या फिटनेसचेही मोठे चाहते आहेत. सहसा राजकारणी लोकांपर्यंत पोहोचणं अवघड असतं. पण ओमराजे निंबाळकर हे कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांना सहज उपलब्ध होतात. तुम्ही फोन केला आणि त्यांनी फोन घेतला नाही असं होणार नाही. आणि फोन घेतला नाही तर पुढच्या एका तासाच्या आत तुम्हाला त्यांचा फोन येणार, असा दावा ते करतात. त्यांचा हा दावा खरा असल्याचं मतदारसंघातील अनेक लोक सांगतात. ट्रक बंद पडल्यावर एका ट्रक चालकाने थेट खासदारांना फोन केला आणि आपण कशाप्रकारे त्याला टामी आणि जॅक उपलब्ध करुन दिला, हा किस्सा ओमराजे यांनी स्वत:च जाहीर सभेत सांगितला होता. 

आता प्रश्न पडतो, ओमराजेंना बंडखोरी करण्याची वेळ का आली? नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ओमराजे आणि त्यांच्या समर्थकांना किंवा ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणावं तसं यश मिळालं नाही. पुढे राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी ओमराजे यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. जिल्हा परिषद निवडणुकीत ओमराजेंना 55 पैकी फक्त 6 गटात यश मिळालं. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून राणा पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील बसल्या.

(नक्की वाचा-  Shiv Sena UBT Crisis: उद्धव-आदित्य ठाकरे गप्प, संजय राऊतांची बॅटिंग; ठाकरे गटात नेमकं काय सुरुये?)

110 पंचायत समिती गणांमध्येही ओमराजेंची वाताहत झाली. नगर पालिका निवडणुकीत 8 पैकी एकाही जागी नगराध्यक्ष बसवता आला नाही. राणा जगजितसिंह पाटील आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यापुढे ओमराजे तोकडे पडले. वरुन पक्षनेतृत्वाचीही काही साथ मिळत नव्हती. फक्त तू लढ मी आहे म्हणून काही होणार नव्हतंच. त्यात विरोधात असल्यामुळं विकासनिधीही मिळत नाही. कार्यकर्ता जगवायचा तर निधी द्यायला हवा. मतदारसंघात कामं करायला हवीत. पण सर्व बाजूंनी कोंडी होत होती. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा दबाव वाढत होता. अशावेळी फक्त कार्यकर्त्यांचा फोन उचलून किंवा त्यांच्या घरच्या वा सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावून काही होणार नाही हे ओमराजेंच्या लक्षात आलं असावं. 

सध्या सोशल मीडियावर ओमराजे यांचे जुने व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे. त्यात निष्ठा मोजण्यासाठी एक मीटर पाहिजे होतं, असं ते एका प्रचारसभेत बोलले होते. पण निष्ठा, नैतिकतेचं राजकारण मुळात उरलंय कुठे? आज मतदार, पक्षाचे कार्यकर्ते नेत्यांना शिव्या घालत आहेत. पण निवडणुकीच्या प्रचारावेळी हेच कार्यकर्ते, अहो मतदारसुद्धा पैसा, दारु, मटण पार्ट्या झोडूनच तर जय बोलतात. बाकी काही अपवाद असतात ज्यांचं काम फक्त सतरंज्या उचलायचं उरलंय. आता तीन वर्ष काही निवडणुका नाहीत. त्यामुळे आज बोंबा मारणारे कार्यकर्ते उद्यापर्यंत पुन्हा जय म्हणताना दिसले तर आश्चर्च वाटायला नको. 

ओमराजे निंबाळकरांमुळे राणा जगजितसिंह पाटील यांना आपला विधानसभा मतदारसंघ बदलावा लागला होता. मात्र आता राणा पाटील आणि मल्हार पाटील यांच्या आक्रमकतेपुढे आणि ताकदीपुढे ओमराजेंचा निभाव लागणं कठीण बनलं होतं. मग राणा पाटील यांना टक्कर द्यायची तर एकनाथ शिंदे सारखा खंबीर माणूस पाठीशी असणं गरजेचं होतं. ओमराजे आणि राणा पाटील दोघे कट्टर विरोधक, मात्र उद्या सत्तेत एकत्रही बसाव लागू शकतं. अशावेळी विरोध कायम ठेवून दोघांची वाटचाल सुरु राहील.

पुढे मतदारसंघ कुणाला सुटतो? मैत्रीपूर्ण लढत होणार का? त्यावेळी कोण कुणाविरोधात उभा राहणार? हे सगळं 2029 लाच कळेल. पण आज सत्तेत असणं, निधी मिळवणं, कार्यकर्त्यांना जगवणं गरजेचं आहे हे ओमराजेंच्या लक्षात आलं असावं. बाकी मतदारांनी 2022 च्या बंडानंतरही ठाकरेंच्या तुलनेत शिंदेंनाच अधिक साथ दिली. पुढेही तसंच काही होईल, असं समजायला सध्या कुठलीच अडचण नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील फॉलोअर्स कमी झाले, सोशल मीडियावर ट्रोलिंग झालं याचा फरक अभिनेत्यांना पडत असेल, नेत्यांना नाही. नेत्यांची लढाई ही जमिनीवरची असते... त्यात यशस्वी होतो तो खरा नेता असतो.

शेवटी लहान तोंडी मोठा घास घेण्याचा मोह आवरला नाही म्हणून... आमच्या लहानपणी कुठल्याही गावात प्रवेश करताना वेशीवर एक भली मोठी लोखंडी पाटी दिसायची. ज्यात मध्ये वाघ आणि दोन्ही बाजूला शिव आणि सेना लिहिलेलं असायचं. आज त्या पाट्या आहेत कुठे? गावागावात शिवसेनेच्या शाखा उरल्यात का? मान्य आजचं राजकारण बदललं आहे.

Omraje Nimbalkar Exclusive: ओमराजे निंबाळकर शिंदेना धप्पा देणार? पत्रावर सही केली नाही? स्पष्टच बोलले

पण बदलत्या राजकारणानुसार नेतृत्वानेही बदलायला हवं. उभरत्या नेतृत्वाने रस्त्यावर उतरायला हवं. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 असा शिफ्टवाईज दौरा न करता कधी एखाद्या गावात, एखाद्या कार्यकर्त्याच्या शेतात मुक्कामी थांबावं. गावात, बांधावर गेल्यावर शेतकरी, मजुरांसोबत भाकरीचे चार घास घ्यावेत. कार्यकर्त्याला मुंबईत बोलावण्यापेक्षा कधी कार्यकर्त्याच्या गावात, घरी गेलात तर अख्खं गाव तुमचं होऊन जाईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com