विशाल पाटील, मुंबई
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदारांनी बंड केले आणि गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेल्या ऑपरेशन टायगरवरं शिक्कामोर्तब झालं. मात्र ठाकरेंची साथ सोडणाऱ्या सहा खासदारांमधील दोन नावांना सगळ्यांनाच धक्का दिला. संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे दोन खासदार बंडखोरांना साथ देणार नाहीत अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंना होती. दोन्ही खासदारांनी संसदीय बैठकीला दांडी मारून शिवसेना पक्षनेतृत्वाला थेट संदेश दिला आहे.
या सर्व घडामोडींनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एनडीटीव्ही मराठीसोबत एक्स्क्लुझिव्ह बातचित केली. यामध्ये त्यांनी सध्या सुरू असलेल्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्याच वेळी त्यांनी आपली पुढील भूमिका 20 जूननंतर स्पष्ट होणार असल्याचे सूचक संकेतही दिले आहेत. ओमराजे निंबाळकर शिंदेंना धप्पा देणार का? अशी चर्चा देखील दुसरीकडे सुरु झाली आहे.
(नक्की वाचा- Shiv Sena UBT Crisis: उद्धव-आदित्य ठाकरे गप्प, संजय राऊतांची बॅटिंग; ठाकरे गटात नेमकं काय सुरुये?)
"मी गेले 3 दिवस पुण्यातच"
नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर होत असलेल्या तीव्र टीकेनंतर ओमराजे निंबाळकर आता कमालीचे सावध झाले असून त्यांनी आपली बाजू मांडली आहे. "मी गेल्या 3 दिवसांपासून मुंबईत नसून पुण्यातच आहे. माझ्या वडिलांच्या (पवनराजे निंबाळकर) केसचा निकाल माझ्यासाठी या घडीला सर्वात महत्त्वाचा आहे. या केसचा निकाल 20 जून रोजी लागणार आहे", असं म्हणत ओमराजे यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे.
(नक्की वाचा- Monsoon Update: राज्यात पाऊस कधी येणार? 'या' तारखेपासून मान्सून पुन्हा सक्रीय होण्याचा IMD चा अंदाज)
निकालानंतर चर्चा करून निर्णय घेणार
पक्षातील संभाव्य फुटीच्या पत्रावर स्वाक्षरी केल्याच्या चर्चांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आपण अशा कोणत्याही स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या पत्रावर सही केलेली नाही. म्हणजेच त्यांनी आपला पुढील निर्णय राखून ठेवल्याचे स्पष्ट दिसत आहे. "20 जूनचा निकाल लागल्यानंतर दोन दिवसांनी मी थेट माझ्या मतदारसंघात जाईन. तेथील मतदार आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करेन आणि त्यानंतरच माझी पुढील राजकीय भूमिका जाहीर करेन," असे ओमराजे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे 20 जूनच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर ठाकरेंना धक्का देतात की शिंदेना धप्पा देतात? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world