Drone Fly At Matoshree: महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कलानगर, वांद्रे (पूर्व) येथील निवासस्थान 'मातोश्री' निवासस्थान परिसरात ड्रोनच्या घिरट्या दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईत ड्रोन उडवण्यास बंदी असतानाही हा प्रकार घडल्याने मातोश्रीवर ड्रोनद्वारे वॉच ठेवला जात आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मातोश्रीवर ठेवली जातेय का नजर?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थान परिसरात ड्रोनने घिरट्या घातल्याचे समोर आले आहे. या ड्रोनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये 'मातोश्री'च्या बीकेसी बाजूच्या दिशेला ड्रोन उडताना दिसत आहे. मुंबईत अनेक संवेदनशील परिसरांमध्ये तसेच व्हीआयपी निवासस्थानांजवळ ड्रोन उडवण्यास सक्त मनाई असताना हे ड्रोन दिसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
उद्धव ठाकरे हे मराठवाड्याचा दौरा आटोपून रात्रीच मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. अशातच आता दुसऱ्याच दिवशी मातोश्री परिसरात ड्रोन दिसल्याने ठाकरे गटाचे नेत आक्रमक झाले आहेत. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मुंबई पोलिसांनी या ड्रोन उडवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसैनिकांकडून आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी याबाबत तात्काळ स्पष्टीकरण दिले आहे. एमएमआरडीएने परवानगी घेऊन ड्रोन उडवले आहे. परिसरातल्या सर्व्हेसाठी परवानगी घेऊनच हे ड्रोन उडवली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.