Devendra Fadnavis : महाराष्ट्र भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी (4 डिसेंबर) निवड करण्यात आली आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि आमदार पंकजा मुंडे यांनी प्रस्तावास अनुमोदन दिले. देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया...
- आपण सर्वांनी एकमताने विधीमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली आणि ही निवड प्रक्रिया करण्याकरिता या ठिकाणी आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीजी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमणजी यांचे देखील अतिशय मनापासून मी आभार मानतो.
- सर्वांनाच कल्पना आहे की यावेळेची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिलेली आहे. या निवडणुकीचे विश्लेषण करायचे झाले तर मी असे म्हणेन की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर निश्चितपणे ठेवलीय ती म्हणजे 'एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकीन है!'
- मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशात विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो,अशा प्रकारचे मेंडेट महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला दिलेले आहे.
- विशेषतः या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्यासोबत पूर्णपणे तनमनाने याठिकाणी असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील मी मनापासून आभार मानतो.
- प्रचंड मोठी जबाबदारीची जाणीव करून देणारा जनादेश जनतेने दिलेला आहे.
- विशेषतः लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके युवा असतील या सर्वांनी आणि समाजातल्या दलित, वंचित, ओबीसी, आदिवासी सर्वांनी जो जनादेश आपल्याला दिलाय त्या जनादेशाचं सन्मान राखण्याचे काम करावे लागणार आहे.
- आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासने पूर्ण करणे याकडे आपली प्राथमिकता असेलच पण त्यासोबत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरिता, महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्याकरिता आपणा सर्वांना सातत्याने कार्यरत राहायचे आहे.
- 2019 साली देखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता. दुर्दैवाने जनतेचा कौल होता तो हिसकावून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी झाली.
- सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या काळात ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला, आपल्या आमदार-नेत्यांना त्रास देण्यात आला, अशाही परिस्थितीत एकही आमदार सोडून गेला नाही, या गोष्टीचाही अभिमान आहे.
- तीनवेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर बसण्याचा मानसन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला, यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानेन.