![MPSC Exam : लोकसेवा आयोगाच्या पेपरसाठी लाखो रुपयांची मागणी? 'त्या' दाव्यावर आयोगाचं स्पष्टीकरण MPSC Exam : लोकसेवा आयोगाच्या पेपरसाठी लाखो रुपयांची मागणी? 'त्या' दाव्यावर आयोगाचं स्पष्टीकरण](https://c.ndtvimg.com/2024-07/nadu5nm8_mpsc-_625x300_01_July_24.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
राहुल कांबळे, प्रतिनिधी
MPSC Exam 2024 :राज्यातील स्पर्धा परीक्ष देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (MPSC) अत्यंत महत्त्वाच्या असतात. राज्यातले लाखो विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीसाठी त्यांच्या तारुण्यातील महत्त्वाचा काळ घालवतात. पेपर फुटीसारख्या रोगाचा या परीक्षांनाही यापूर्वी फटका बसला होता. येत्या रविवारी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यासाठी आयोग पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय दिलं स्पष्टीकरण?
येत्या रविवारी म्हणजेच 2 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज असून उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. डॉ. खरात म्हणाल्या की,. 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024' या परीक्षेच्या पूर्वीच प्रश्नपत्रिकांची उपलब्धता करुन देण्यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत.
( नक्की वाचा : Ajit Pawar : दमानियांच्या पुराव्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार? अजित पवारांनी दिलं उत्तर )
सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत आणि अशा कोणत्याही माहितीमध्ये तथ्य नाही. काही जणांनी फोन वरून उमेदवारांना प्रश्नपत्रिका मिळवण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस आयुक्त, पुणे यांच्या तर्फे या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारांना अशा प्रकारचे दूरध्वनी आल्यास, त्यांनी contact-secretary@mpsc.gov.in या ईमेलवर तक्रार नोंदवावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
या परीक्षेसाठी 2 लाख 86 हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त आणि व्यवस्था ठेवण्यात आली असल्याचेही डॉ खरात यांनी यावेळी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world