Rain News Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असतानाच, आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
17 मार्चला दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर
राज्याच्या दक्षिण भागात आज (17 मार्च) पावसाची सर्वाधिक शक्यता आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेषतः तेलंगणा आणि कर्नाटक सीमेलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
18 मार्च ते 20 मार्चदरम्यान तीव्रता वाढणार
हवामान तज्ज्ञांच्या मते, 18 मार्चपासून पावसाचे क्षेत्र आणि तीव्रता दोन्ही वाढणार आहे. 18 मार्च ते 20 मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. काही संवेदनशील जिल्ह्यांमध्ये या काळात गारपीट होण्याचा धोकाही वर्तवण्यात आला आहे. २१ मार्चपासून मात्र राज्यातील हवामान पुन्हा पूर्वपदावर येण्याचे संकेत आहेत.
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचा सतर्कतेचा इशारासध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. अशा वेळी पाऊस आणि गारपीट झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खालील खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे:-
- काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावीत.
- बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणलेला कृषीमाल ओला होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी प्लास्टिक आच्छादनांचा वापर करावा.
मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने खालील सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे:
- विजेच्या कडकडाटावेळी झाडाखाली किंवा टिनशेडखाली उभे राहू नका.
- विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि हाय-व्होल्टेज वाहिन्यांपासून दूर राहा.
- मोकळ्या मैदानात असल्यास तातडीने पक्क्या इमारतीचा आश्रय घ्यावा.
- हवामानातील या बदलांमुळे पुढील चार दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world