Maharashtra Rain IMD Alert News: गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अशातच हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे, काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार!
राज्याच्या विविध भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी, कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही पट्ट्यांत पावसाच्या सरींनी हजेरी लावत जनजीवन सुखद केले आहे. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, धोका अद्याप टळलेला नाही. आज, १८ जुलै रोजी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत आज वादळी पावसाचा अंदाज आहे. हा इशारा उद्या, १९ जुलै रोजीही काही जिल्ह्यांसाठी कायम राहणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. हवामान खात्याने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर जाणे टाळावे, झाडांचा आश्रय घेऊ नये आणि सुरक्षित ठिकाणी राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
( नक्की वाचा : Ola Uber चे भाडे आता थेट सरकार ठरवणार, राज्य सरकारचे नवे धोरण जाहीर, वाचा सविस्तर माहिती )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world