जाहिरात

ST Bus Fare Hike: एसटी प्रवास महागला! मुंबई ते धुळे आणि पुणे ते अहिल्यानगर प्रवासाचे नवे तिकीट दर एका क्लिकवर

ST Bus Fare Hike: एसटी बसेसच्या तिकीट दरात 13.56 टक्के भाडेवाढ करण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे.

ST Bus Fare Hike: एसटी प्रवास महागला! मुंबई ते धुळे आणि पुणे ते अहिल्यानगर प्रवासाचे नवे तिकीट दर एका क्लिकवर
ST Bus Fare Hike: नवीन भाडेवाढीनुसार मुंबई आणि पुण्याहून सुटणाऱ्या महत्त्वाच्या बसेसचे तिकीट दर वाढले आहेत.
मुंबई:

ST Bus Fare Hike: राज्यातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीने प्रवास आता महागणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटी बसेसच्या तिकीट दरात 13.56 टक्के भाडेवाढ करण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी दिली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला जास्तीची कात्री लागणार असली, तरी यापूर्वी लागू केलेली साध्या बसेसची 10 टक्के हंगामी भाडेवाढ अब पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. नवीन दरांचा फटका मुख्य मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.

भाडेवाढ का करण्यात आली? सरकारचे स्पष्टीकरण

आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि अखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली मोठी वाढ हे या भाडेवाढीचे मुख्य कारण आहे. याशिवाय, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये झालेली वाढ, वाहनांचे सुटे भाग, टायर आणि बसेसच्या देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यामुळे ही भाडेवाढ करणे अपरिहार्य झाले होते. एसटी महामंडळावर वाढत्या खर्चामुळे प्रचंड आर्थिक ताण निर्माण होत असल्याने, प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड सेवा देण्यासाठी हा कडू डोस घ्यावा लागल्याचे सरकारने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

या निर्णयावर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व विश्वासार्ह सेवा देणे यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. ही भाडेवाढ करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी नेहमीप्रमाणेच लालपरीवर आपला विश्वास कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

( नक्की वाचा : Ola Uber चे भाडे आता थेट सरकार ठरवणार, राज्य सरकारचे नवे धोरण जाहीर, वाचा सविस्तर माहिती )
 

मुख्य शहरांमधील प्रवासाचे नवीन दर

नवीन भाडेवाढीनुसार मुंबई आणि पुण्याहून सुटणाऱ्या महत्त्वाच्या बसेसचे तिकीट दर वाढले आहेत. मुंबई ते सोलापूर प्रवासासाठी आता 775 रुपयांऐवजी 800 रुपये मोजावे लागणार आहेत, तर मुंबई ते कोल्हापूर प्रवासासाठी प्रवाशांना 730 रुपयांऐवजी आता 755 रुपये द्यावे लागतील. मुंबई ते धुळे या मार्गाचे तिकीट 664 रुपयांवरून 685 रुपये झाले आहे. यासोबतच मुंबई ते सातारा आणि मुंबई ते चिपळूण या दोन्ही मार्गांचे तिकीट दर सारखेच असून ते आता 498 रुपयांवरून 515 रुपये करण्यात आले आहेत. तसेच मुंबई ते नाशिक प्रवासासाठी आता 355 रुपयांऐवजी 370 रुपये मोजावे लागतील.

पुणे आणि नाशिकहून जाणाऱ्या बसेसचे नवे तिकीट

पुण्यातून जाणाऱ्या बसेसच्या दरांमध्येही बदल झाला आहे. पुणे ते संभाजीनगर या प्रवासाचे तिकीट 454 रुपयांवरून 470 रुपये झाले आहे, तर पुणे ते सोलापूर प्रवासासाठी आता 465 रुपयांऐवजी 480 रुपये द्यावे लागतील. पुणे ते कोल्हापूर या मार्गाचे भाडे 421 रुपयांवरून 435 रुपये करण्यात आले आहे. 

अ.क्र.बसेसचा मार्गजुने दर (रुपये)नवीन दर (रुपये)
1मुंबई ते सातारा498515
2मुंबई ते कोल्हापूर730755
3मुंबई ते नाशिक355370
4मुंबई ते धुळे664685
5मुंबई ते चिपळूण498515
6मुंबई ते सोलापूर775800
7पुणे ते कोल्हापूर421435
8पुणे ते अहिल्यानगर233240
9पुणे ते छत्रपती संभाजीनगर454470
10नाशिक ते पुणे410425

या संपूर्ण दरांमध्ये पुणे ते अहिल्यानगर हा प्रवास सर्वात स्वस्त असून त्याचे तिकीट 233 रुपयांवरून 240 रुपये झाले आहे. याशिवाय, नाशिक ते पुणे या महत्त्वाच्या मार्गावरील प्रवासासाठी प्रवाशांना आता 410 रुपयांऐवजी 425 रुपये मोजावे लागतील. सरासरी पाहता प्रत्येक मुख्य मार्गावर प्रवाशांना पूर्वीपेक्षा साधारणपणे 7 रुपये ते 25 रुपयांपर्यंत जास्तीचा भार सहन करावा लागणार आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com