Maharashtra Rain News : गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मराठवाडाही अतिवृष्टीच्या फेऱ्यात असून विदर्भातही पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. आजही महाराष्ट्रभरात पावसाचे संकेत आहे. मुंबई आणि उपनगरात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू असून दिवसभरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आजही पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगाली, बुलढाणा याशिवाय विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. आजही महाराष्ट्रभरात कोसळधारेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात रात्रभर पाऊस सुरू होता. सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सारवानी या गावात नदीला पूर आल्याने गावात पाणी शिरले. गावातील पुलावरून पाणी जात असल्याने गावकऱ्यांचा संपर्क तुटला. त्यामुळे गावकऱ्यांनी अख्खी रात्र जागून काढली. पुराच्या पाण्याच्या भीतीने लोक रात्रभर जीव मुठीत धरून होते.
नक्की वाचा - Ahilyanagar Rain : गावांचा संपर्क तुटला, घरं-जनावरे वाहून गेली; अहिल्यानगरमध्ये ढगफुटीसदृश्य परिस्थिती
15 सप्टेंबरला रात्री उशीरा जायकवाडी धरणाचे 10 ते 27 असे एकूण 18 दरवाजे 0.5 उचलून 2.5 फूटपर्यंत उघडण्यात येणार असून गोदावरी नदी पात्रात 9432 क्युसेक इतका विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात एकूण 18 गेटमधून 47160 क्युसेक विसर्ग सुरू राहील. आवक लक्षात घेऊन विसर्गात वेळोवेळी वाढ अथवा घट करण्यात येणार असल्याची माहिती आहे.