Maharashtra Rain Update : पुढील काही दिवस महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज 22 जुलै रोजी मुंबई, कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पुढील दोन ते तीन दिवस मुंबई, उपनगर, पुणे, कोकणात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे हा आठवडा तुफान पावसाचा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रविवार 27 जुलैपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लान करीत असाल तर याची खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोल्हापूर, सातारा या भागातही पुढील तीन ते चार दिवस तुफान पावसाचा अंदाज आयएमडीकडून वर्तविण्यात आला आहे.
लोणावळ्यात पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं...
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचं दमदार पुनरागमन झालंय. 16 जुलैपासून लोणावळ्यात पावसाने ओढ दिली होती. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ही पर्यटन नगरी जिथे पावसाळ्यात गर्दीचा ओघ असतो. तिथेच यंदा काहीसं 'शांत' वातावरण होतं. त्यामुळे पर्यटकांच्या आनंदाला विराम लागल्यासारखं वाटत होतं. मात्र, 16 ते 21 जुलै या सहा दिवसांत 101 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत तब्बल 83 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे लोणावळ्यात पुन्हा एकदा पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आहे. घाटात धुके, पावसाचा शिडकाव, आणि हिरवाईने सजलेली दरी पाहून अनेक पर्यटक टायगर पॉइंट, राजमाची, भुशी धरण या ठिकाणी गर्दी करत आहेत. तसंच, घाटात मुसळधार पावसामुळे वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालवावं लागतंय. धुकं, ओलसर रस्ते, आणि अचानक कमी होणारी दृश्यमानता लक्षात घेता प्रशासनाने देखील सतर्कतेचं आवाहन केलं आहे.
24 जुलै - हवामान विभागाचा अंदाज
नागपूर जिल्ह्यासह विदर्भात पुढील चार दिवस पावसाचे...
10-12 दिवसांपासून सुट्टी घेतलेला पाऊस नागपुरात पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज आहे. बंग्रालच्या उपसागरात येत्या 24 तासांत चक्रीय वाऱ्यांचे क्षेत्र अर्थात सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झाल्याने पाऊस पडणार असल्याचे संकेत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढचे चार दिवस नागपूर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
25 जुलै - हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाने 23, 24 आणि 26 जुलै रोजी पावसाचा येलो अलर्ट जारी केला असून 25 जुलै रोजी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. याशिवाय काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याचाही अंदाज आहे. जिल्हा प्रशासनाने देखील सावधानतेचा इशारा दिला आहे. या काळात नदी-नाल्यांच्या काठाजवळ न जाण्याचा आणि पावसादरम्यान शेतावर किंवा झाडाखाली न थांबण्याचा इशारा देण्यात आला आहे.