रविवारी 15 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, उपनगर, पुणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुण्यातील अनेक भागात पाणी साचल्यामुळे कित्येक शाळांना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे मुंबईत मध्य, पश्चिम आणि हार्बर लोकल सेवेवर परिणाम झाला असून सर्व लोकल सेवा विलंबाने धावत आहेत. दरम्यान पुढील तीन तास वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळा वर्तविला आहे.
सातारा, रत्नागिरी, रायगड आणि पुणे या चारही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. परिणामी आज महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे लोकल सेवा उशिराने
पावसाचा थेट परिणाम मुंबईतील रेल्वे सेवेवर झाला आहे. मध्य रेल्वे १० ते १५ मिनिटं उशिरा तर हार्बर लाईन सुद्धा ७ ते १० मिनिटं उशिराने धावत आहे. पावसाचा परिणाम पश्चिम रेल्वेवर झाला असून लोकलक ५ मिनिटं उशिराने धावत आहे. सकाळच्या सत्रात पावसामुळे चाकरमानी आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले आहे. मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक शाळाने निर्णय घेऊन मुलांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सुट्टी दिल्याचं सांगितलं जात आहे. हडपसर परिसरात बहुतेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
पुण्याच्या इंदापुर तालुक्यात मुसळधार पाऊस झालेला आहे यामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. इंदापूर तालुक्यातील बाभुळगावला जाणारा मार्ग बंद पडलेला आहे. पुणे सोलापूर महामार्ग ते बाभुळगाव या रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याला पूर परिस्थिती निर्माण झाल्याने हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद पडला आहे.
जोरदार पडलेल्या पावसानंतर सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ
रविवारी सायंकाळी दक्षिण रायगडला जोरदार पावसाने झोडपले. याचा सर्वाधिक फटका महाड आणि पोलादपुरला बसला. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने महाड शहर चांभारखिंड परिसरात, मुंबई गोवा महामार्गालगत सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते तर महाबळेश्वर परीसरा झालेल्या जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली असून पोलादपुरमधील सावित्री नदी लगतच्या परिसरात रस्त्यावर रात्री उशिरा पर्यंत पुराचे पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता. दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसत आहे. विशेष म्हणजे सर्वच जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाड्यात दोन दिवसांत एकूण ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, याचा सुमारे ६४० गावांना फटका बसला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात तर पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. अनेक गावांत शेकडो एकर जमिनी पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावसाचा जोर पाहता जायकवाडी धरणाचे देखील संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले होते, त्यामुळे गोदावरीला देखील मोठा पूर आला. तर पुढील २ दिवसांत छत्रपती संभाजीनगरसह परभणी, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली व जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
परतीच्या पावसाला सुरुवात
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास रविवारी १४ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाला असून महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राजस्थानमधून मोसमी पाऊस परत फिरल्यानंतर महाराष्ट्रातून त्याचा परतीचा प्रवास १० ते १५ दिवसांनी सुरू होतो. त्यानुसार, महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो, असा अंदाज आहे.