सागर कुलकर्णी, मुंबई: आजपासून महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित प्रतिनिधींचा शपथविधी सोहळा होणार असून सोमवारी विधानसभेच्या अध्यक्षांची घोषणा होणार आहे. आजच्या अधिवेशनात हंगामी अध्यक्ष असलेले कालिदास कोळंबकर यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी अनेक आमदारांनी केलेला खास पेहराव, हटके एन्ट्री तसेच विविध घोषणा देत घेतलेल्या शपथविधींनी सर्वांचेच लक्ष वेधले.
आजच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी दरम्यान भारतीय जनता पक्षाचे आमदार चैनसुख संचेती हे पहिल्या क्रमांकावर शपथ घेणारे आमदार ठरले. त्यानंतर जयकुमार रावळ, माणिकराव कोकाटे आणि पाचव्या क्रमांकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सुरु असताना सभागृहात आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उपस्थित आमदारांकडून जय श्री राम तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या.
भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांचाही शपथविधी लक्षवेधी ठरला गिरीश महाजन यांनी संस्कृतमध्ये शपथ घेत सर्वांचे लक्ष वेधले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ, सना मलिक, समाजवादी पक्षाचे अबु आझमी यांनी अल्लाह साक्ष असा उल्लेख करत आपल्या पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.
तसेच आमदार भिमराव केराव यांनी शाहू फुले आंबेडकर यांच्यासह बिरसा मुंडा यांचे नाव घेत शपथविधीला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर मुफ्ती महमद यांनी उर्दुमधून, कुमार खलानी यांनी सिंधीमधून आपली शपथ घेतली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश शिरसागर यांनी आई तुळजाभवानी, बाळासाहेब ठाकरे यांच्यासह धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेत आपला शपथविधी घेतला.
महत्वाची बातमी: मुंबई, कोल्हापूर ते बारामती.... अजित पवारांची 1000 कोटींची मालमत्ता मुक्त