मंगेश जोशी, जळगाव
वादळीवाऱ्यामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक जळगावामध्ये घडली आहे. यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगेत असलेल्या थोरपाणी पाड्यावरील ही घटना आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमध्ये दहा वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला आहे. पण त्याच्या डोक्यावरील आईवडिलांच्या मायेची सावली कायमची दुरावली आहे.
(नक्की वाचा: माळीणपेक्षा भयंकर दुर्घटना; पापुआ न्यू गिनिआत दरड कोसळल्याने 670 जणांच्या मृत्यूची भीती)
10 वर्षांचा मुलगा बचावला
रविवारी (26 मे 2024) संध्याकाळी यावल, चोपडा आणि सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्येही वादळीवाऱ्याचा तडाका बसला. वादळामुळे थोरपाणी आदिवासी पाड्यावरील मानसिंग गुना पावरा यांचे घर कोसळले. दुर्घटनेमध्ये मानसिंग गुना पावरासह ( वय 28 वर्ष), पत्नी सोनाबाई नानसिंग पावरा (वय 22 वर्ष), मुलगा रतिलाल नानसिंग पावरा (वय 3 वर्ष) आणि बाली नानसिंग पावरा (वय 2 वर्ष) अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान मानसिंग पावरा यांचा 10 वर्षांचा मुलगा दुर्घटनेत थोडक्यात बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्यासह यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर कोसळलेल्या घराच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढले आणि यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमार्टेमसाठी पाठवले.
(नक्की वाचा: मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार, तणावामुळे परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात)
वादळीवाऱ्यामुळे घरांचे-पिकांचे नुकसान
जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून वादळीवाऱ्याचा कहर पाहायला मिळत आहे. शनिवारी (25 मे 2024) आलेल्या वादळी वाऱ्यामुळे रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाल्याने शेकडो लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेतपिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. या वादळीवाऱ्याचा सर्वाधिक फटका केळीच्या बागांना बसला आहे. शेकडो हेक्टर जमिनीवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत.
(नक्की वाचा: थरकाप उडवणारा अपघात CCTVमध्ये कैद, तिला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने गमावला जीव)