Maharashtra Cold Wave: पुढील 12 दिवस महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार असून, 19 डिसेंबर (दर्शवेळ अमावस्या) पर्यंत राज्यभरातील नागरिकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत रात्री 'कोल्ड वेव्ह' तर दिवसा 'थंड दिवस' (Cold Day) परिस्थितीमुळे हुडहुडी जाणवेल. चक्रीवादळे आणि पश्चिमी झंजावातांचे विश्लेषण करून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
थंडीचा पारा आणखी वाढणार!
नाशिकमधील मालेगाव येथे तापमानाचा पारा अतिशय खाली घसरला आहे. मालेगावमध्ये किमान तापमान ९.० अंश सेल्सियस (सरासरीपेक्षा -१०.७ अंशांनी कमी) आणि कमाल तापमान २६.८ अंश सेल्सियस (सरासरीपेक्षा -५.२ अंशांनी कमी) नोंदवले गेले आहे. अमरावती (९.६°C), यवतमाळ (८.८°C), गोंदिया (९.०°C) आणि वाशिम (११.४°C) येथेही थंडीची लाट दिसत आहे. अहिल्यानगर (९.५°C), जळगाव (९.४°C), नागपूर (९.६°C) यांसारख्या शहरांमध्येही तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे. मालेगावमध्ये सर्वाधिक थंडी पडल्याचे आकड्यांवरुन दिसत आहे.
Goa Fire : 25 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार? क्लब मालक थायलंडला पळाला, मुंबईचं काय आहे कनेक्शन?
मुंबईसह संपूर्ण कोकण विभागासाठी दिलासादायक बाब म्हणजे, या भागांत पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके किंवा त्याहून किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणातील नागरिकांना थंडीचा तीव्र त्रास जाणवणार नाही. हवामान तज्ज्ञांनी थंडीचा कडाका वाढण्यामागे चार प्रमुख कारणे सांगितली आहेत.
थंडी वाढण्याची कारणे काय?
उत्तरी वाऱ्यांचा प्रभाव: उत्तर भारतातून येणारे ईशान्येकडील थंड वारे महाराष्ट्रात पूर्वेकडील होत आहेत. तसेच, हवेचा दाब पूर्ववत (१०१६ हेक्टोपास्कल) होत असल्याने ही थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे.
मान्सूनचा घटलेला प्रभाव: दक्षिण भारतातील ईशान्य (हिवाळी) मान्सूनचा प्रभाव काहीसा कमी झाल्यामुळे तेथील हंगामी पूर्वेकडील वारे १३ अंश अक्षांशापर्यंत मर्यादित राहतील. यामुळे उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे येणाऱ्या थंडीला कोणताही मोठा अडथळा निर्माण होणार नाही.
पश्चिमी झंजावातांचे मार्गक्रमण: वायव्य आशियातून उत्तर भारतात नियमितपणे एकापाठोपाठ येणारे पश्चिमी झंजावात (Western Disturbances) महाराष्ट्राकडे थंड ईशान्येकडील वारे घेऊन येत आहेत, ज्यामुळे थंडी वाढत आहे.
जेट स्ट्रीमचा विस्तार: समुद्रसपाटीपासून साडेबारा किलोमीटर उंचीपासून ते साडेचार किलोमीटर उंचीपर्यंतचा वेगवान, अतिथंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या झोताचा (जेट स्ट्रीम) पट्टा उत्तरेकडून दक्षिणेकडे (३९°N ते २२°N) रुंदावला आहे. या 'व्हर्टिकली डाऊन' आणि 'हॉरिझॉनंटली लॅटरल' झालेल्या बदलामुळे महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पुढील १२ दिवस थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
Japan Earthquake : जपान हादरलं! 7.6 तीव्रतेचा मोठा भूकंप, या भागासाठी सुनामीचा इशारा, Video व्हायरल