प्रज्वल कुलकर्णी, नाशिक:
Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई पुण्यासह, विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीने तडाखा दिला असून या पावसाने शेतीमालांचे मोठे नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी जनावरे दगावल्याच्या, वीज पडून मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्यात. अशातच हवामान विभागाने 18 मे पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला असून बुधवार (ता. 14 मे) आणि गुरुवारी अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Bhushan Gavai : न्यायमूर्ती भूषण गवई 52 वे सरन्यायाधीश, घेतली पदाची शपथ)
या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट:
हवमान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर,, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. इथे विजेच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक, अहिल्यानगर पुणे सातारा या चार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपणार
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 14 ते 18 मे दरम्यान कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह वीज आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुजरात राज्यातही 14 आणि 15 मे रोजी अशा हवामानाची शक्यता आहे. तसेच कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातमध्ये 30-50 किमी प्रतितास वेगाने वारे, वादळी वाऱ्यांसह वीज आणि पावसाची शक्यता आहे.
नक्की वाचा - Justice BR Gavai : देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, भावी सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आईंची मोठी मागणी
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
मध्य महाराष्ट्रात 14 व 15 मे रोजी थंडरसक्वॉल, म्हणजेच 50-60 किमी प्रतितास वेगाने, तर काही ठिकाणी 70 किमी प्रतितासापर्यंत जोरात वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान 15 मे रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. याकाळात हवामान विभागाने शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्यांमुळे झाडं पडणे, विजेचे खांब नुकसान होणे आणि प्रवासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.