Rain News: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्यांना 'रेड अलर्ट'; दोन जिल्ह्यांत शाळांना सुट्टी जाहीर

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे, नाशिक, साताऱ्यासह धुळे, जळगाव, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला असून राज्यात पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Advertisement

कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट? 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील अमरावती आणि यवतमाळ, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा, पुणे आणि नाशिक घाट परिसरासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

(नक्की वाचा-  Virar News: चिमुकलीवरून सासरे आणि सुनेमध्ये जोरदार वाद; रागाच्या भरात पुढे भयंकर घडलं)

ऑरेंज अलर्ट 

विदर्भातील अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर, कोकण व उत्तर महाराष्ट्रात रायगड आणि नंदुरबार, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, नांदेड आणि जालना या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केली आहे. 

येलो अलर्ट 

ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, बुलढाणा तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला मध्यम आणि हलक्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

(नक्की वाचा-  Nagpur News: आधी देवाला हात जोडले, कान धरून माफी मागितली अन्...; चोरांचा दानपेटीवर डल्ला, VIDEO व्हायरल)

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढला आहे. यामुळे पुढील 3 ते 4 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

नागरिकांना आवाहन 

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पावसाळ्याच्या दिवसांत पुणे आणि नाशिकच्या घाटांमध्ये पर्यटन करण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत. घाटांमध्ये दरड कोसळण्याची आणि रस्ते निसरडे होण्याची शक्यता असल्याने अनावश्यक प्रवास टाळावा, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
 


Topics mentioned in this article