पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिमेकडील नारंगी गावात एक दुर्दैवी करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकलीला ताब्यात घेण्यावरून सासरे आणि सुनेमध्ये झालेल्या वादात सासऱ्याने दिलेल्या जोराच्या धक्क्यामुळे सुनेचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राची कल्पेश पाटील (वय 28) असे मृत महिलेचे नाव आहे.
माहेरी जाण्यावरून आणि बाळावरून झाला वाद
पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, नारंगी गावातील भगतआळी येथे राहणारे गणपत सखाराम पाटील हे त्यांची सून प्राची पाटील यांना सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून प्राची यांचा भाऊ विशाल पाटील गुरुवारी सकाळी त्यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांच्या घरी आला होता. त्यावेळी प्राची यांची आठ महिन्यांची मुलगी ही तिचे आजोबा म्हणजेच गणपत पाटील यांच्या खांद्यावर होती.
(नक्की वाचा- Nagpur News: आधी देवाला हात जोडले, कान धरून माफी मागितली अन्...; चोरांचा दानपेटीवर डल्ला, VIDEO व्हायरल)
धक्का लागला अन् फरशीवर आपटून झाला मृत्यू
माहेरी निघताना प्राची यांनी आपल्या लहान मुलीला सोबत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सासरे गणपत पाटील यांनी मुलीला देण्यास सक्त नकार दिला. यावरून सासरे आणि सुनेमध्ये जोरदार बाचाबाची व वाद सुरू झाला. वादाच्या भरात सासरे गणपत पाटील यांनी सून प्राची यांना अत्यंत रागाच्या भरात जोराचा धक्का दिला. या अचानक मिळालेल्या धक्क्यामुळे प्राची यांचा तोल गेला आणि त्या थेट फरशीवर जोरात आपटल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाला आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
बोळींज पोलिसांकडून गुन्हा दाखल; सासऱ्याला ताब्यात घेतले
या धक्कादायक दुर्घटनेनंतर मृत प्राची पाटील यांचे भाऊ विशाल पाटील यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून बोळींज पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी सासरे गणपत पाटील यांना तातडीने ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
(नक्की वाचा- लोक हसले, पण गडी खचला नाही; 4 आंबे साडेतीन लाखांना विकून दाखवले, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याची देशभर चर्चा)
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपआयुक्त शशीकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जायभाये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास बोळींज पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world